Maharashtra CM: दहा रुपयांत थाळी अन् एक रुपयात क्लिनिक; 'मविआ'चं ठरलं होsss
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:41 PM2019-11-28T16:41:06+5:302019-11-28T16:41:48+5:30
शिवसेनेकडून 10 रुपयांची थाळी आणि 1 रुपयात क्लिनीक योजना सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. कारण, कॉमन मिनिमम प्रोग्रामध्ये शेतकऱयांची तात्काळ कर्जमाफी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आलंय. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही भरिव मदत देण्याचा निर्णय या कार्यक्रमातून जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील 10 रुपयांची थाळी आणि 1 रुपयात क्लिनीक हेही आश्वासन पूर्ण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय.
महाविकास आघाडीकडून कॉमन मिनिमम प्रोग्राम जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तात्काळ मदत आणि पिकविमा या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा, यासाठीही या कार्यक्रमात घोषणा करण्यात आलीय. तसेच, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा करण्यासंदर्भातील धोरणही या कॉमन मिनिमम प्रोग्रामध्ये आखण्यात आलंय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. शिवसेनेकडून 10 रुपयांची थाळी आणि 1 रुपयात क्लिनीक योजना सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार, कॉमन मिनिमम प्रोग्रामध्ये या दोन्ही आश्वासनांची पूर्तता करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरेंनी गरिबांसाठी 10 रुपयांत सकस थाळी देणार असल्याच जाहीर केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा शपथविधी झाल्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत या दोन्ही योजनांना लवकरच मंजूरी मिळणार आहे.
दरम्यान, कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये बेरोजगारी, उद्योगधंदे, महिलांची सुरक्षा, शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य, जात वर्गवारीनुसार देण्यात येणाऱ्या योजनांचाही नागरिकांना फायदा होईल, याचा विचार करण्यात आलाय.