मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. त्याच पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला त्यांचे लहान बंधू मनसेप्रमुखराज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ईडी चौकशीत काहीही निष्पन्न होणार नसल्याचे सांगत राज ठाकरेंची पाठराखण केली होती. याआधी देखील उद्धव ठाकरे यांना प्रकृतीच्या निमित्ताने लिलावती रुग्णालयात दोघांची भेट झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने उद्धव ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तसेच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाच्या निमित्ताने देखील ठाकरे कुटुंब एकत्रित पाहायला मिळाले होते. राजकारण व कुटुंब वेगळं ठेवणारे ठाकरे कुटुंब उद्धव ठाकरेंच्या शपथविधाला पुन्हा एकत्र पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी देखील राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहिल्यास आनंद होईल असं मत व्यक्त केलं आहे.
'मविआ' सरकारमध्ये मनसेचंही 'कल्याण'; उद्धव ठाकरेंच्या टीममध्ये राज ठाकरेंचाही शिलेदार?
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. त्याच पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर निवड झाल्यानंतर त्यांनी भाजपावर निशाणा साधला. 30 वर्ष ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांच्याविरोधात 30 वर्ष लढतो ते मात्र माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसेच, तीन टोकाचे तीन लोक एकत्र येत आहोत, पण एक वेगळी दिशा देशाला देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये राहिलेले असतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.