मुंबई - भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा आणि त्यांचे स्टेटमेंट भाजपाला चांगलेच टोचल्याचे दानवे यांच्या टीकेवरुन दिसून येतंय. संजय राऊत यांना वेड लागलं असून त्यांना वेड्याच्या इस्पितळात भरती करण्याची गरज असल्याचे दानवे यांनी म्हटलंय.
राज्यातील राजकीय घडामोडींवर दानवेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाची भूमिका जाहीर केली. अजित पवार यांच्याकडेच अद्यापही व्हीप बजावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, भाजपा बहुमत सिद्ध करेल आणि हे सरकार पुढील 5 वर्षांपर्यंत स्थिरपणे कामकाज करेल, असा विश्वासही रावासाहेब दानवेंनी व्यक्त केलाय. अजित पवारांनी भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. 20 प्रमुख मंत्रालयं आणि अजित पवारांना अडीच वर्षं मुख्यमंत्र्यांची भाजपानं ऑफर देऊन आपल्याकडे वळवल्याची माहिती सूत्रांकडून मला मिळाली आहे, असे विधान राऊत यांनी केलंय. त्यानंतर, दानवेंनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्या विधानाचं खंडन करताना, राऊत यांच्यावर जहरी टीका केली. तसेच, त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज असल्याचे दानवेंनी म्हटलंय.