मुंबई: अजित पवारांनी भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी सोमवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली. त्यातच आज शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी पुन्हा एकादा भाजपा आणि अजित पवारांवर घणाघात केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपाकडून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपावर केला आहे. बहुमत नसेल तर फोडाफोडी का करता असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परततील का असा सवाल विचारल्यानंतर अजित पवार जागतिक नेते आहेत. अजितदादांनी क्रांतिकारक काम केलं असल्याचं सांगत अजित पवारांना देखील संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे भाजपा राज्यपालांकडे बहुमताच बनावट पत्र सादर करुन सत्तेत आले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन लोकशाहीची सुटका करवी असं स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा बाजार सत्तांधांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचं भावनिक नातं अजिबात नाही असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची अशी लक्तरं काढू शकतात. महाराष्ट्राच्या जडणघडणीत, महाराष्ट्राच्या निर्मितीत या मंडळींनी रक्ताचा सोडाच, पण घामाचा एक थेंबही गाळला नसल्यानं हा राजकीय घोटाळा त्यांनी केला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून १६२ आमदारांचं पत्र राजभवनात आता सादर केलं. हे सर्व आमदार राजभवनात राज्यपालांसमोर उभे राहायला तयार आहेत. इतकं स्पष्ट चित्र असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली?, असा सवाल शिवसेनेनं सामनामधून उपस्थित केला आहे.
मुंबईतील हॉटेल हयातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शिवसेना-अपक्ष आमदारांच्या महाविकासआघाडीच्या 162 विधिमंडळ सदस्यांनी संविधानाला साक्षी मानून सोमवारी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करणार शपथ घेतली. रात्रीच्या अंधारात, अनैतिक मार्गाने स्थापन झालेल्या सरकारच्या विरोधात मत देण्याबाबत शपथ घेण्यात आली.