मुंबई - मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला. हा शपथविधी समारंभ अनेकांनी याचि देही याचि डोळा पाहिला. उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपस्थित जनसागराला साष्टांग दंडवत घालत उद्धव यांनी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र शपथविधी सोहळ्यादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षातसंजय राऊतांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मात्र संजय राऊत शपथविधी सोहळा संपण्याआधीच शिवाजी पार्कमधून निघून गेले. शपथविधी सोहळा लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. मंचावर येण्यासाठी गर्दीतून वाट काढताना झालेल्या धक्काबुक्कीमुळे राऊत यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळेच आराम करण्यासाठी शपथविधी सोहळा सुरू असताना संजय राऊत मंचावरून निघून गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे त्यांनी थोडा वेळ आराम केला. बरं वाटल्यानंतर राऊत पुन्हा आले मात्र तोपर्यंत शपथविधी सोहळा संपन्न झाला होता.
राज्यातील उद्धव ठाकरे सरकारच्या अग्निपरीक्षेचा आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. त्यामुळे सभागृहात ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारकडे 170 पेक्षा अधिक संख्याबळ असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. दुपारी 2 वाजता विधानसभेचं विशेष अधिवेशन भरणार आहे. त्यावेळी बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटलं की, आज बहुमत दिन आहे. सरकारकडे 170 पेक्षा अधिक संख्याबळ असणार आहे. हमसे जमाना खुद है, जमाने से हम नही अशा शायराना अंदाजामध्ये संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ट्विट आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. आज दुपारी 2 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय होईल. त्यानंतर, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडतील. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. रविवारी सकाळी 11 वाजता पुन्हा विधानसभेचे अधिवेशन भरेल. त्यात आधी अध्यक्षांची निवड केली जाईल. विरोधी पक्षनेत्याची निवड होईल. दुपारी 4 वाजता राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर, अधिवेशन संस्थगित होईल. नागपूर अधिवेशन एक आठवड्याचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणार आहे. याचा अर्थ, केवळ एक आठवड्याचे हे अधिवेशन असेल.