मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पहिली कॅबिनेट बैठक आज सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये पार पडली. या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.
किल्ले रायगड संवर्धनाचे 606 कोटीचे काम आहे, त्यातल्या पुढच्या 20 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिदषेत दिली. तसेच, येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ आजवर खोट्या घोषणांचा पाऊस पाडला गेला. मला शेतकऱ्यांच्या योजनांची वस्तुस्थिति सादर करण्यास मुख्य सचिवांना निर्देश दिले. दोन दिवसात वस्तुस्तिती सादर होताच शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे शेतकऱ्यांना देणार आहे. त्यांना तुटपुंजी मदत करायची नाही. जे ठरवलं आहे. ते तिन्ही पक्षाचे मंत्री मिळून करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
याशिवाय, राज्यात कुणालाही दहशत वाटेल असे सरकार असणार नसल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, कॉमन मिनिमन प्रोग्रॅम हा पूर्ण राज्यासाठी आहे. सरकार राज्याच आहे. त्यामुळे ज्यांनी टीका केली त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांनी अभ्यास करुण सांगावे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्याच्या इतिहासात ठाकरे परिवारातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह या सर्वांना शपथ दिली.