Join us

भाजपावर टीका केलीच, पण नाव न घेता उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींनाही ३ टोमणे लगावले, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 12:58 PM

अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली. 

मुंबई- केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाया, मंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजले. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली. 

विरोधकांकडून होत असलेले गंभीर आरोप, केंद्रीय यंत्रणांवर होत असलेल्या कारवाया, शिवसैनिक आणि नातेवाईकांवर होणारे आरोप या सर्वांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. ही इडी आहे की घरगडी आहे, तेच कळत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या भाषणात म्हटलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील नाव न घेता तीन टोमणे लगावले.

उद्धव ठाकरेंनी मारलेले टोमणे-

१. उद्धव ठाकरे यांच्यावर सतत तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार अशी टीका होते. त्याचा उल्लेख करुन ते म्हणाले, बाबरी मशिदीच्यावेळेस बाळासाहेबांनी तुमच्यापैकी ज्यांना वाचवलं ते तरी त्यांना काय उत्तर देणार आहेत? ज्यावेळेला त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं तेव्हा बाळासाहेब त्यांच्यासोबत राहिले, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. रावणाची तोंड उडवली तरी पिक्चरमध्ये दिसत तसं नवीन तोंड येतं. मग नंतर कळतं रावणाचा जीव बेंबीत आहे. काहींना केंद्रात सरकार मिळालं तरी बेंबीत नाही तर मुंबईमध्ये असतो, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

२. मंत्री नवाब मलिकांवर दाऊदवर कथित संबंधामुळे जे आरोप होत आहेत त्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली की, "केंद्रीय संस्था इतक्या पोकळ झाल्या का? नवाब मलिक मंत्री झाले, दाऊदचे हस्तक, सर्वत्र फिरतायत. ते आधी कसं दिसलं नाही? केंद्राच्या यंत्रणा काय फक्त टाळ्या वाजवा, दिवे लावा एवढंच करतंय? त्यांना या दिव्यात हे कसं दिसलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसेच ओबामांनी कधी ओसामा बिन लादेनच्या नावाने मतं मागितली नाहीत. ओबामांनी पर्वा न करता पाकिस्तानात घुसून ओसामाला मारलं. याला म्हणतात हिंमत. तुम्हीही तसं घुसून दाऊदला मारुन दाखवा, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

३. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत तुम्ही होता. पण अफजल गुरुला फाशी देऊ नये असं मुफ्ती यांचं म्हणणं होतं. त्यांची मतं कशी होती हे तुम्हाला माहिती होती पण तरीही तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत होता, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच मुदस्सर लांबीने देवेंद्र फडणवीसांना हार घातल्याची उद्धव ठाकरे यांनी आठवण केली. असे फोटो अनेक जणांसोबत असतात. माझे फोटो देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. 

सत्तेसाठी जीव जळत असेल तर मला तुरुंगात टाका-

"केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रकार अत्यंत नीच आणि निंदनीय आहे. ज्या शिवसैनिकांनं ९० च्या दंगलीत आपल्या जीवाची पर्वा न करता हिंदूंच्या बचावासाठी जीवाचं रान केलं. आज त्यांना तुम्ही त्रास देत आहात. मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो. त्यांना कशाला त्रास देता. मी येतो तुमच्यासोबत. सत्तेसाठी जीव जळत असेल तर मी येतो तुम्ही मला तुरुंगात टाका", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

तेव्हा मलिक, देशमुख चालले असते का?-

दाऊदचा विषय सध्या खूप चघळला जात आहे. रामाच्या नावानं मतं मागून झाली. आता दाऊदच्या नावानं मत मागणार का? दाऊद नेमका आहे तरी कुठं हे काही तुम्हाला माहित आहे का? अमेरिकेत ओबामानं कधी ओसामाच्या नावानं मतं मागितली होती का?, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच फडणवीसांनी खरंतर 'रॉ'मध्ये घेतलं पाहिजे. तिथं जे झटपट प्रकरणं सोडवतील. ज्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवर तुम्ही आरोप करत आहात. त्यांना आज तुरुंगात टाकलं आहे. तेच मलिक आणि देशमुख तुम्हाला पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग यशस्वी झाला असता तर चालले असते ना?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपामहाराष्ट्र सरकार