Join us  

कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, तरी....; भाजपा-मनसे युतीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 11:39 AM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतत तीन वेळा देशातील पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई- भाजप आणि मनसेच्या युतीबाबत मला माहीत नाही. त्याविषयी फार बोलावं अशी देशात, राज्यात स्थिती नाही. रात गयी बात गयी. मुंबई, ठाणे, नाशिक, केडीएमसी, औरंगाबाद आणि इतर पालिका सेना ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयावर भाष्य केलं. 

कोल्हापूर उत्तरमध्ये जर पैसे घेऊन मतदान केलं तर मतदारांच्या मागे ईडी लागेल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोल्हापूर उत्तरच कशाला? गोव्यात पणजी आणि साखळी मतदारसंघात आधी तिथल्या मतदारांच्या मागे ईडी लावा. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या काही मतदारसंघात ईडी लावणं गरजेचं आहे. उत्पल पर्रिकरांचा पराभव झाला. साखळी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात ईडी चौकशी लावली तर त्याचं स्वागत करू, असं संजय राऊत म्हणाले.

राज्याचं नेतृत्व शिवसेना करते याचा अर्थ शिवसेनेला राजकारण उत्तम कळतं, शिवसेनेत निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि शिवसेनेला राज्यातील जनतेचा पाठिंबा आहे. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्रं आले, महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसांविरुद्ध कितीही कट कारस्थान केली, मुंबईविरुद्ध कट कारस्थानं केली तरी त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहू, असं संजय राऊतांनी सांगितलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतत तीन वेळा देशातील पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच तुम्ही कितीही षडयंत्र रचा. काही फरक पडत नाही, असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

दरम्यान, नितीन गडकरी हे रविवारी रात्री मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले होते. राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजपा-मनसे युतीबद्दल चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं.

भेटीबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “अशा भेटीगाठी होत असतात. आम्हीही अनेकांना भेटतो, आमच्याकडे अनेकजण येतात. प्रत्येक भेटीमागे राजकारण असतं असं नाही. त्यावर आम्ही बोलावं असं काही नाही”.दरम्यान युतीच्या शक्यतेबद्दल विचारलं असता त्यांनी “त्याविषयी फार काही बोलावं अशी काही स्थिती महाराष्ट्रात, देशाच्या राजकारणात नाही. रात गई, बात गई,” असं उत्तर दिलं.

टॅग्स :राज ठाकरेमनसेसंजय राऊतनितीन गडकरीशिवसेनाभाजपा