Dahi Handhi: 'आरोग्याला प्राधान्य देऊन सण काही काळ बाजूला ठेवू', मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 02:38 PM2021-08-23T14:38:09+5:302021-08-23T14:38:58+5:30
Dahi Handhi: दहीहंडी सण साजरा करू देण्यासाठी गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.
Dahi Handhi: दहीहंडी सण साजरा करू देण्यासाठी गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांना जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन आपण सण, उत्सव काहीकाळ बाजूला ठेवू असं आवाहन करत दहीहंडीवर यंदाही निर्बंध असतील याबाबतचे संकेत दिले आहेत.
दहीहंडी सण थाटात साजरा करण्यासाठी शासनानं परवानगी द्यावी नाहीतर आंदोलन करु असा इशारा दहीहंडी मंडळांच्या प्रतिनिधींनी घेतला आहे. त्यात भाजपानंही दहीहंडी सण कोरोना संबंधीचे नियम पाळून साजरा करू देण्यास परवानगी देण्यास हरकत नाही अशी भूमिका घेतली आहे. सण साजरा करण्यासाठीच्या काही मागण्या घेऊन गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री ठाकरेंसोबत बैठक केली. यात मुख्यमंत्री ठाकरेंनी जनतेचा जीव वाचवणं हेच आपलं प्राधान्य असलं पाहिजे, असं ठाम मत व्यक्त केलं आहे.
"जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवू, मानवता दाखवू आणि कोरोनाला हद्दपार करु, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यायला हवा", अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
आपले सण आपण जपलेच पाहिजेत. पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करत आपण आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
...नाहीतर धोका अटळ
"बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची अवस्था आपण पाहायला हवी. लसीकरण झालेलं असतानाही काही देशांमध्ये लॉकडाऊन लावावं लागलं आहे. तर इस्रायलनं पुन्हा मास्क वापरायला सुरुवात केली आहे. आपण जर आता समजुतीनं घेतलं नाही आणि त्यानुसार वागलो नाही तर धोका अटळ आहे", असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला.