Join us

'मातोश्री-2' तयार, ठाकरे कुटुंबाचं नवं घर पाहिलत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 1:13 PM

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमके कोठे राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमके कोठे राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मातोश्रीजवळचं मातोश्री-2 ही आठ मजली इमारत उभारण्यात आली आहे.एकूण 10 हजार स्‍क्‍वेअर फूट क्षेत्रात बांधण्यात आली आहे.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी बाजी मारत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडावा लागणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमके कोठे राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सध्या ठाकरे कुटुंब मातोश्रीत वास्तव्यास आहे. यापुढे कोठे राहायला जाणार हे निश्चित झालेलं नाही. मात्र असं असताना मातोश्री-2 ची जोरदार चर्चा रंगली आहे. 

वांद्रेमधील कलानगर भागातील मातोश्रीजवळच मातोश्री-2 ही आठ मजली इमारत उभारण्यात आली आहे. मातोश्रीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नवी मातोश्री-2 ची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. लवकरच ठाकरे कुटुंब या नव्या इमारतीत राहण्यासाठी जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री, सभापती केले. मात्र या सर्वांचा रिमोट कंट्रोल मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या हाती असायचा. अनेक राजकीय हालचाली मातोश्रीवरून घडल्या आहेत. त्याच्या जवळच मातोश्री-2 ही नवी इमारत उभारण्यात आली आहे.

मातोश्री-2 ही इमारत एकूण 10 हजार स्‍क्‍वेअर फूट क्षेत्रात बांधण्यात आली आहे. या इमारतीत 5 बेडरुम, स्टडी रुम, होम थिएटर, स्विमिंग पूल, हायटेक जिम आणि भव्य हॉल आहे. तसेच आठ मजली इमारत असून त्यामध्ये 3 ड्युप्लेक्स फ्लॅट आणि दोन प्रवेशद्वार असल्याची माहिती मिळत आहे. मातोश्री-2 चे एक प्रवेशद्वार कलानगरच्या दिशेने तर दुसरे बीकेसीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेला असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्र्यांनाही आपले बंगले सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्याचसोबत मंत्रालयातील मंत्र्यांची कार्यालयेही रिक्त करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाल्याने प्रशासनाने तातडीने कार्यालय ताब्यात घेतली. बंगले रिकामे केले. मात्र वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांना मुक्काम कायम होता. याच दरम्यान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली हे संपूर्ण प्रकरण कोर्टात गेले. पण अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार काही दिवसांत कोसळलं. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरच मुक्काम करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने देवेंद्र फडणवीस दाम्पत्यांना वर्षा बंगला तातडीने रिक्त करावा लागणार आहे. फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची धुरा येणार असल्याने त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला दिला जाईल. मात्र तो बंगला मिळेपर्यंत त्यांना फडणवीसांना दुसरीकडे घरं शोधावं लागणार आहे. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुंबई