Maharashtra CM : उद्धव ठाकरे भावूक, स्वप्नपूर्तीनंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेपुढं नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 10:03 PM2019-11-26T22:03:22+5:302019-11-26T22:03:30+5:30
Maharashtra CM : शरद पवारांच्या आदेशाने उद्धव ठाकरेंचे नावं मुख्यमंत्रीपदासाठी सूचित करण्यात आलं
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात भाजपा सरकार कोसळल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला तीन पक्षाच्या या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी असं नाव देण्यात आलं. ही आघाडी देशाला नवी दिशा देईल असा ठराव मांडण्यात आला. त्याला राजू शेट्टी, अबू आझमी, बच्चू कडू, कपिल पाटील यांचं अनुमोदन दिलं. या विकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावं असा ठराव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडला. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर जाऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.
शरद पवारांच्या आदेशाने उद्धव ठाकरेंचे नावं मुख्यमंत्रीपदासाठी सूचित करण्यात आलं. या बैठकीत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंना मी वैयक्तिक कधीच भेटलो नव्हतो, पहिल्यांदा भेटलो तेव्हा कळालं ही व्यक्ती साधी आहे, सरळ आहे. हे सरकार किती वेळ टीकेल असं बोललं जातं पण किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी वेळ गेला. ही आघाडी ५ वर्ष नाही तर १५ वर्ष टीकेल असा विश्वास आहे. जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आलं. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांचे दर्शन घेतले. बाळासाहेब ठाकरे या खोलीत राहायचे, त्या खोलीतील त्यांच्या प्रतिमेसमोर उद्धव ठाकरे नतमस्तक झाले. खोलीत माँ मिनाताई यांचीही प्रतिमा असल्याने शिवसैनिकासाठी हा फोटो अतिशय भावूक क्षण असल्याचं म्हणता येईल. बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झाल्याने उद्धव ठाकरेही भावूक झाले होते. सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं, असंच म्हणता येईल.
महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले. pic.twitter.com/HDX5PtFbOu
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) November 26, 2019