मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवारांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावाही केला. मात्र शिवसेनेनं यावर आक्षेप घेत लोकशाहीला काळिमा फासणारी ही घटना असून शिवसेना, राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली असताना भाजपाला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत का दिली? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला.
संजय राऊत यांनी याबाबत सांगितले होते की, अजित पवारांना ५ आमदारांच्या बळावर उपमुख्यमंत्रिपद दिलं, भाजपाला आम्ही व्यापारी समजत होता पण कालचा व्यापार चुकला. व्यापार प्रामाणिक केला असता तर भाजपावर ही वेळ आली नसती. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार सर्व सुरक्षित आहेत. आमच्या तीन पक्षाकडे १६५ आमदारांचे संख्याबळ आहे. आधी १७० आकडा सांगितला होता आता १६५ आमदारांचा संख्याबळ आमच्याकडे आहे. पुढील १० मिनिटात जरी राज्यपालांनी आम्हाला बोलाविले तरी बहुमताचा आकडा आम्ही तीन पक्ष सिद्ध करू शकतो असा दावा केला आहे.
तर भाजपाचे आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना टोला लगावत ज्यांना १० दिवसांत किमान समान कार्यक्रम ठरविता आला नाही ते १० मिनिटात आमदारांचा बहुमताचा आकडा कसा दाखविणार? असं शेलारांनी सांगितले आहे. तसेच सोनिया गांधींशी सलगी 'गोरा बाजार', मग अजित पवारांशी आघाडी 'काळा बाजार' का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचसोबत शनिवारी जे घडलं तो देशाच्या इतिहासात काळा दिवस आम्ही पाहिला नाही, राष्ट्रपती भवन, राजभवनाचाही काळाबाजार भाजपाने केला. इंदिरा गांधी यांच्यावर आणीबाणी आणली त्यापेक्षाही वाईट दिवस भाजपाने आणला आहे अशी टीका राऊतांनी केली त्यावर शेलारांनी उत्तर दिलं. याबाबत बोलताना आशिष शेलार यांनी सांगितले की, संजय राऊत यांच्या वक्तव्याने निदान स्पष्ट झालं की इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणून भयानक कृत्य केलं होतं. काँग्रेससोबत सत्तेत जाण्यापूर्वीच शिवसेनेने इंदिरा गांधीवर अशाप्रकारे टीका केली आहे असा टोला आशिष शेलारांनी संजय राऊत यांना लगावला.