मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस मोठा धक्का दिला. अजित पवारांनासोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार हे राष्ट्रवादी विधीमंडळाचे नेते होते त्यांच्याकडे राष्ट्रवादी आमदारांच्या सह्यांचे पत्र होते. हे पत्र भाजपाला पाठिंबा असल्याचं अजित पवारांनी सांगितल्याची शक्यता आहे.
मात्र या सर्व राजकीय धक्कातंत्रात देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपाने ट्विट केलं आहे. त्यात लिहिलं आहे की, अजून कोणालाही दिलेल्या शब्दापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द मोठा आहे. शब्द राखला, तो पुन्हा आला असं सांगत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज एक महिना उलटला आहे. निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीला लोकांनी कौल दिला. यात भाजपाला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच शिवसेनेनं आता ठरल्याप्रमाणे करा असं सांगत मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा आणि शिवसेनेतील तणाव वाढत गेला. शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडत भाजपाला एकप्रकारे इशारा दिला. मात्र कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद सोडण्यास भाजपा तयार नव्हती. देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होतील असं भाजपाने नेते वारंवार सांगत होतं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत होता. तर मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही बोलणं झालं नव्हतं असं भाजपाकडून सांगण्यात येत होतं. त्यामुळे कोणाचा शब्द खरा अन् कोणाचा शब्द खोटा या संघर्षात भाजपा-शिवसेना नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते.
निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन केलेली घोषणा दरम्यानच्या काळात सर्वांसाठी विनोदाचं निमित्त बनलं होतं. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत सत्तास्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या होत्या. उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व करतील असं शरद पवारांनी सांगितले होतं. सर्व बैठका सकारात्मक होत होत्या. मात्र एका रात्रीत भाजपाने अजित पवारांच्या मदतीने राज्यात सत्तास्थापन केली. राज्यात घडणाऱ्या या नाट्यात अखेर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. त्यामुळे भाजपाने केलेलं ट्विट हा शिवसेनेला उपरोधिक टोला तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.