मुंबई- राज्यात सेना-भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून दोघांचंही घोडं अडलं. आता शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस मिळून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका होत आहेत. शरद पवार यांच्याकडे काल झालेल्या साडेतीन तास चर्चेमध्ये दोन्ही पक्षांत ठरलेला किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्वीकारण्यावर व सत्तावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर आज पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बैठक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेबरोबर जाण्यासंदर्भात सूचक विधान केलं. जर आम्हाला एकत्र येऊन 5 वर्षं स्थिर सरकार द्यायचं आहे, तर काही मुद्द्यावर स्पष्टता आवश्यक आहे. त्यावर आमची चर्चा सुरू आहे. आज आम्ही मुंबईतही जाणार आहोत. आपण सर्वजण राज्य घटनेला मानतो. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाला मानतो. त्यात वेगळा आग्रह असण्याचं कारण नाही. चर्चेच्या गोष्टी आम्ही आणखी पुढे नेतोय, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी शिवसेनेसोबतच्या संभाव्य सरकार स्थापनेवर भाष्य केलं आहे.
...तरच शिवसेनेबरोबर सरकार स्थापण्याचा विचार करू, काँग्रेसचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:38 AM