नवी दिल्ली-
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. भाई जगताप यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर येण्याची शक्यता आहे.
भाई जगताप यांनी दिलेलं निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलं तर शिवाजी पार्कवर काँग्रेस आगामी पालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याची दाट शक्यता आहे. भाई जगताप यांच्या उपस्थितीत याआधीच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची जिल्हा स्तरीय बैठक झाली होती. यात काँग्रेस पक्ष २२७ जागा लढवण्यावर ठाम असल्याचं जगताप यांनी स्पष्ट सांगितलं होतं. याशिवाय राहुल गांधी यांना मुंबईत निमंत्रित करण्यासाठीचं नियोजन जगताप यांनी ऑगस्ट महिन्यापासूनच सुरू केलं होतं. २८ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्ष शिवाजी पार्क मैदानात भव्य सभा घेणार असल्याचं काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. आता राहुल गांधी डिसेंबर महिन्यात मुंबईमध्ये आलेच तर ते कोणत्या विषयावर बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.
राज्यात सत्तेत आल्यानं काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे. याचंच प्रतिबिंब पालिका निवडणुकीत पाहायला मिळू शकतं. याच उद्देशानं मुंबई काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीसाठी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींनी सभा ही पालिका निवडणुकीसाठी खूप जमेची बाजू पक्षासाठी ठरू शकते याच उद्देशानं प्रयत्न केले जात आहेत.