Join us

महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही रणनीती बनवली; सोनिया गांधींना कळवली" 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 2:48 PM

Maharashtra Election Result 2019: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आम्ही रणनीती बनवल्याचं सांगितलं आहे.

मुंबईः महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले तरी कोणीही सत्ता स्थापन करू शकलेलं नाही. शिवसेना-भाजपाला जनतेनं स्पष्ट बहुमत दिले असतानाच सत्ता वाटपावरून दोघांमधला संघर्ष विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना अडून बसली असून, भाजपा त्यांना ते देण्यास तयार नाही. प्रसंगी राष्ट्रपती राजवट लागू करू असा इशारा भाजपानं दिल्यानं शिवसेनाही चांगली संतप्त झाली आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर मिळून सत्ता स्थापन करता येऊ शकते का, याचीही चाचपणी करत आहे. दुसरीकडे भाजपाचाही इतर पक्षांमधले आमदार फोडून सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपावगळता इतर सगळेच पक्ष सतर्क झाले आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आम्ही रणनीती बनवल्याचं सांगितलं आहे. राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधींना कळवली असून, आम्हीसुद्धा रणनीती बनवली आहे, राष्ट्रपती राजवटीने कोणी घाबरून जाणार नाही. आमदार फुटतील अशी आम्हाला आता भीती नाही. आता कोणी फुटण्याचे धाडस करणार नाही आणि कोणी फुटलं तर आम्ही सगळे मिळून त्याचा पराभव करू, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जनमत भाजपच्या विरोधात होतं ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.आतापर्यंत भाजपानं सत्ता स्थापन करायला हवी होती, पण असं होताना दिसत नाही आहे. कारण भाजपा आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही, याला जबाबदार भाजपाच आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. जर भाजपाने दिलेल्या उमेदवाराचा किंवा अध्यक्षांचा पराभव झाल्यास तो सरकारचा पराभव समजला जातो, असं म्हणत विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून थोरातांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान असून, काळजीवाहू सरकारनं जनतेची काळजी घ्यावी, असा सल्ला थोरातांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

टॅग्स :काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019बाळासाहेब थोरातराष्ट्रवादी काँग्रेस