महाराष्ट्राला प्रदूषणाचा वेढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:06 AM2021-03-07T04:06:31+5:302021-03-07T04:06:31+5:30
प्रदूषणाची मानके पूर्ण न करणारी सर्वाधिक शहरे राज्यात; मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पुणे, नाशिकचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क ...
प्रदूषणाची मानके पूर्ण न करणारी सर्वाधिक शहरे राज्यात; मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पुणे, नाशिकचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमानुसार (एनसीएपी) प्रदूषणाची मानके पूर्ण न करणारी महाराष्ट्रात सर्वाधिक १८ शहरे आहेत. २०१७ ची प्रदूषण पातळी विचारात घेऊन या शहरांनी २०-३० टक्के प्रदूषण पातळी कमी करायची आहे. हवेच्या गुणवत्तेची राष्ट्रीय मानके सलग पाच वर्षे पूर्ण न करू शकणाऱ्या शहरांचा यात समावेश केला जातो.
प्रदूषणाची मानके पूर्ण न करणाऱ्यांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, आदी शहरांचा समावेश होतो. वसई-विरार महापालिका क्षेत्राचा यात अगदी अलीकडे समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वायू प्रदूषणात सर्वाधिक वाटा वाहने, उद्योग आणि बांधकाम क्षेत्र (औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसह) तसेच इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आहे. राज्यात वरील अठरापैकी नऊ शहरांतून कायमस्वरूपी हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी देणारी यंत्रणा ३६ ठिकाणी बसविलेली आहे.
पल्माेकेअर रिसर्च ॲण्ड एज्युकेशन फाउंडेशन, पुणे येथील डाॅ. संदीप साळवी यांनी सांगितले की, वायू प्रदूषणाचे आर्थिक परिणामही होतात. वायू प्रदूषणामुळे अवेळी होणाऱ्या मृत्यूंमुळे देशाला २ लाख ८० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागते. हे प्रमाण देशाच्या एकूण उत्पन्नाच्या १.३६ टक्के आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हेच प्रमाण १.१ टक्के आहे.
* प्रदूषणात कोणाचा वाटा किती टक्के
- रस्त्यावरील धुळीचे प्रमाण एकूण प्रदूषणात सर्वाधिक (७१ ते ४५ टक्के).
- त्या खालोखाल ८ टक्के वाटा बांधकामांचा, तर ३ टक्के वाहनांच्या प्रदूषणाचा आहे.
- उर्वरित उद्योग, घरगुती जळण, विमान वाहतूक, जहाजे, खाणावळी, बेकरी आणि स्मशानभूमीचा आहे.
* नायट्रोजन ऑक्साइडसाठी उद्योग क्षेत्राचा वाटा ३५ टक्के
- वाहनांचा २४ टक्के
- घरगुती १८ टक्के
- उर्वरित उघड्यावरील जळण, खानावळ, आदींचा आहे.
....................