Join us

Maharashtra Corona Updates: मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली; मार्गदर्शक तत्वे जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 9:38 PM

Maharashtra Corona Updates: मुंबई महापालिकेने आता सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. 

मुंबई - कोरोना बाधित रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असताना यामध्ये ९० टक्के रुग्ण इमारतींमधील आहेत. पाचपेक्षा जास्त बाधित रुग्ण सापडल्याने आतापर्यंत ६८१ इमारती तर आठ हजार ७९० इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत. प्रत्येक इमारतींमध्ये तसेच सोसायट्यांमधील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. 

अशा आहेत सूचना....

  • सोसायटीमध्ये वावरताना प्रत्‍येकाने मास्‍क घालणे बंधनकारक आहे. या नियमाचेे पालन होत असल्याची खातरजमा सोसायटीतील सर्वांनी करावी.
  • घराबाहेर पडताना प्रत्‍येकाने सॅनिटायझर, मास्‍क व हातमोज्‍यांचा वापर करुन बाहेर पडावे. लहान मुले, ज्‍येष्‍ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
  • सोसायटी - वसाहतीमध्ये दोन व्‍यक्‍तींमध्‍ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा. प्रतीक्षागृहाचा शक्‍यतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे.
  • सोसायटीत दरवाज्याची कडी, कठडे, लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्‍यतो टाळावे.
  • सोसायटीतील लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपड्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कच-याच्‍या डब्‍यात टाकावेत.
  • सोसायटीतून पुन्‍हा घरात येताच कुठेही स्‍पर्श न करता सर्वात आधी साबणाने हात धुवावेत. सोसायटीमध्ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला शक्यतो थेट प्रवेश देऊ नये.
  • बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्‍यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्‍वच्‍छ धुण्‍याची सोय आदी बाबी उपलब्‍ध असल्‍याची खातरजमा करावी.
  • ऑनलाईन पार्सल मागवल्‍यानंतर, सोसायटीमध्‍ये ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे अशा एकाच ठ‍िकाणी ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्‍यावे. शक्‍य असल्‍यास काही तास ते पार्सल खुल्‍या जागेत राहू द्यावे आण‍ि नंतर घरात न्‍यावे.
  • सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्‍पर्श करण्‍यापूर्वी त्‍यांचे निर्जंतुकीकरण करावे. स्थानिक महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष असे  महत्‍त्‍वाचे संपर्क क्रमांक ठळकपणे दिसतील अशा रितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे.

 

लस घेतल्यानंतरही स्वयंशिस्त पाळा  पालिकेचे मुंबईकरांना आवाहन

कोरोना रुग्णांची संख्या आता पूर्वीपेक्षा तिप्पट झाली आहे. मात्र आजही सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्वीप्रमाणे सक्रिय सहकार्य केल्यास या संकटावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे. यासाठी लस घेतल्यानंतरही स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

कोरोना प्रतिबंधात शिथिलता आल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम मुंबईत सध्या दिसून येत आहेत. दररोज आठ हजारांहून अधिक बाधित रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने दररोज एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र कोरोनावर औषध उपचार आणि हमखास तोडगा नसल्याने नागरिकांनी जीवन शैलीमध्ये आलेली शिथिलता बदलण्याची गरज असल्याचे मत पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका