Join us

रक्तदान करून साजरा झाला ‘महाराष्ट्र दिन’

By admin | Published: May 02, 2017 3:43 AM

महाराष्ट्र दिनानिमित्त गोराई येथील प्रगती विद्यालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून ३५ युनिट रक्त गोळा करण्यात तरुणांना यश आले

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त गोराई येथील प्रगती विद्यालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून ३५ युनिट रक्त गोळा करण्यात तरुणांना यश आले. स्वयम् युवा प्रतिष्ठान, आम्ही मावळे आणि प्रगती विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांसह परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. बोरीवली पश्चिम येथील नवजीवन रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध महाविद्यालयाच्या माजी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. या वेळी प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र, भेटवस्तू व रक्तदान केल्याचे कार्ड प्रदान करण्यात आले. प्रगती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ यांच्या उपस्थितीमध्ये या वेळी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचाही कार्यक्रम संपन्न झाला. या दरम्यान शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशेष म्हणजे, अनेक तरुणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले. ‘संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांना मानवंदना देण्याचा आमचा दरवर्षी प्रयत्न असतो. यंदा या शिबिराचे तिसरे वर्ष होते आणि आम्हाला चांगल्या प्रमाणात यश लाभले याचा आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया आयोजक समिती सदस्य विवेक धराडे याने दिली, तसेच शिबिराच्या एक दिवस आधी या तरुण मंडळीने ढोलताशाचे दमदार वादन करून परिसरामध्ये रक्तदानाबाबत जनजागृतीही केली. (प्रतिनिधी)