Maharashtra Day: जगाला वाटावा हेवा, असा 'हा' महाराष्ट्रातील अतुल्य ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 10:51 AM2018-05-01T10:51:08+5:302018-05-01T10:51:08+5:30
जगाला हेवा वाटावा अशी काही आश्चर्य आपल्या महाराष्ट्रात आहेत. ती पाहून नक्की म्हणाल, 'गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा!'
मुंबईः 'गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा', असं आपण सगळेच अभिमानानं म्हणतो. पण, जेव्हा कुठेतरी भटकंतीला जायचा विषय येतो, तेव्हा बरेच जण 'आउट ऑफ महाराष्ट्र' किंवा 'अब्रॉड' जायचाच प्लॅन करतात. पण जगाला हेवा वाटावा अशी काही आश्चर्य आपल्या महाराष्ट्रात आहेत. ही सगळी आश्चर्य 'याचि देहि, याचि डोळा' पाहण्याचा पण आपण आज महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर करू या....
लोणार सरोवर
महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर म्हणजे एक चमत्कारच. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने जो प्रचंड खड्डा पडला त्यातून निर्माण झालेलं हे सरोवर म्हणजे निसर्ग, विज्ञान आणि संस्कृतीचा मिलाफच आहे. जगभरात अशा प्रकारची केवळ तीन सरोवरं असल्यानं अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था - 'नासा'नेही लोणारची दखल घेतलीय. महाराष्ट्रातल्या प्रत्येकानंच हे आश्चर्य पाहायलाच हवं.
वारी
वारीची परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली हे सांगणं जरा कठीणच आहे. कारण, साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचे पणजोबाही पंढरपूर वारी करत असल्याचा उल्लेख आढळतो. परंतु, आज पंढरीच्या वारीत जो पालखी सोहळा पाहायला मिळतो, ही परंपरा ही संत तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांनी सुरू केली. तुकोबांच्या पादुका देहूहून आळंदीत आणायच्या आणि माऊलींच्या पादुकांसोबत पंढरीला न्यायच्या, ही परंपरा 1685 ते 1830 पर्यंत सुरू होती. त्यानंतर हैबतबाबांनी माऊलींच्या पादुकांची स्वतंत्र आषाढवारी सुरू केली.
अजिंठा-वेरुळची लेणी
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरुळची लेणी म्हणजे महाराष्ट्राचं वैभवच. स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकलेचा अद्भुत आविष्कार असलेली ही लेणी पाहायला जगभरातून पर्यटक येतात. अजिंठा येथे एकूण 29 लेण्या आहेत. ही लेणी वाकाटक चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळात निर्मिली गेली असावीत. तर, वेरुळमध्ये प्राचीन काळात कोरलेल्या १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशा एकूण ३४ लेण्या पाहायला मिळतात. त्या साधारणपणे पाचव्या ते दहाव्या शतकादरम्यान कोरण्यात आल्या असाव्यात.
कास पठार
समुद्रसपाटीपासून 1000 ते 1250 मीटर उंचावर, 10 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेलं कास पठार म्हणजे जैवविविधतेचा हॉटस्पॉटच. 280 प्रजातींची फुलं या पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलतात. वेली, झुडपं यांचा विचार केल्यास 850 प्रजाती कास पठारावर आहेत. त्याशिवाय 59 जातींचे सरपटणारे प्राणीही इथे आहेत. युनेस्कोनं 2012 साली जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत कास पठाराचा समावेश केला आहे.
रायगड
महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे सगळे किल्ले म्हणजे राज्याची आन-बान-शानच. पण, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचा रुबाब काही औरच. महाराष्ट्रात जन्मलेल्या, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या, शिवरायांना मानाचा मुजरा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं हा गड पाहायलाच हवा.
मुंबईचा डबेवाला
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे; तर सिलिकॉन व्हॅलीतील हायटेक कंपन्यांपासून ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंत सगळ्यांनाच ज्यांनी आपल्या अफाट-अचाट 'मॅनेजमेंट'नं 'याड' लावलं ते मुंबईचे डबेवाले महाराष्ट्राची शानच आहेत.