Join us

'भारतीय संविधानाचे हेच सौंदर्य'; द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 10:10 PM

द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलं आहे.

नवी दिल्ली/मुंबई- संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. मुर्मू यांनी विरोधकांचे उमेदवार असलेल्या यशवंत सिन्हा (Yashwant Sinha)  यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मतं तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं मिळाली आहेत. 

एनडीएनं राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिलेचा चेहरा देत धक्कातंत्र आजमावलं होतं. देशातील आदिवासी समाजाचा सन्मान म्हणून विरोधकांमधील काही पक्षांनीही मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली असं म्हणता येईल. 

द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलं आहे. आपल्या देशासाठी अत्यंत आनंदाची बातमी...माननीय द्रौपदी मुर्मू जी यांची भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राकडून हार्दिक अभिनंदन...भारताने सर्वोच्च पदासाठी आदिवासी महिला आणि सामान्य नागरिकाची निवड केली आहे. आपल्या लोकशाहीचे आणि भारतीय संविधानाचे हेच सौंदर्य असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मुर्मू यांनी आघाडी घेतली होती ती अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यापर्यंत कायम राखली. पहिल्या टप्प्यात मुर्मू यांना ५४० मतं मिळाली होती. या मताचे मूल्य ३,७८,००० इतकं होतं. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचं मूल्य १,४५,००० इतकं होतं. 

दुसऱ्या फेरीत मुर्मू यांना १३४९ मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीत विजयावर शिक्कामोर्तब करत मुर्मू यांची विजयाची आघाडी एकूण ८१२ मतांपर्यंत पोहोचली. तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं पडली. तिन्ही फेरीत एकूण मिळून द्रौपदी मुर्मू यांना २१६१ मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना १०५८ मतं मिळाली. 

टॅग्स :द्रौपदी मुर्मूदेवेंद्र फडणवीसराष्ट्रपती निवडणूक 2022