गेल्या काही दिवसापासून काँग्रेसमधून मोठे नेते बाहेर पडत आहेत. काल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा दिला. चव्हाण यांचा राजीनामा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आज दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज पक्षप्रवेश मुंबईतील भाजपच्या कार्यालयात झाला. चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार अमर राजुरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, हर्षवर्धन पाटील, भाजप नेते आशिष शेलार हे नेते उपस्थित होते.
काही दिवसापूर्वी मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला राजीनामा दिला होता, आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल ा असून लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगळी परंपरा आहे. आम्ही एकमेकांविरोधात असून सुद्धा एकमेकांना साथ दिली. आज मी माझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात करत आहे.मी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची स्फूर्ती, प्रेरणा घेऊन देशात, राज्यात काम करता आले पाहिजे. राज्याच्या, देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान दिले पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी पक्षामध्ये प्रवेश करत आहे', असंही चव्हाण म्हणाले.
"आजवर मी राजकीय क्षेत्रात काम करत असताना मी सकारात्मक दृष्टीकोण घेऊन काम केले आहे. आम्ही विरोधी पक्षात असतानाही आमच्या जिल्ह्याला मतदारसंघाला देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला. तिथे मी आजपर्यंत रोहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केले आहे.भाजपमध्ये प्रवेश घेत असताना प्राणिकपणे काम करेन. आगामी निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही चव्हाण म्हणाले.
"राजकारण एक सेवेचं माध्यम आहे, मला वाटतं की मला कोणावरही वैयक्तिक टीका टीप्पणी करायची नाही. व्यक्तिगत मी कोणावरही आरोप करणार नाही. मी आजपासूनच सकारात्मक कामाला सुरुवात केली आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्यांच फडणवीसांनी कौतुक केलं, त्यांच्या काळात जे चांगलं काम झालं त्यावेळी आम्हीही त्यांचं कौतुक केलं. सभागृहात आम्ही एकमेकांविरोधात बोललो पण सभागृहाबाहेर सोबत असायचो. पक्ष मला जी जबाबदारी देईल ते मी करणार आहे.हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, मला कोणही जा म्हटले नाही. मी सगळ्याच गोष्टीवर आज बोलणार नाही. योग्य वेळ येईल तेव्हा बोलणार आहे'.