Join us

मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन; PM मोदींकडूनही मराठीत शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 10:04 AM

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा मोठ्या प्रमाणात उभारण्यात आला होता.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच १ मे महाराष्ट्र दिनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केलं आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकावर जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठी जनतेला ६३ व्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींनी मराठीतून ट्विट करत मराठी माणसाचं कौतुक केलंय.  

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा मोठ्या प्रमाणात उभारण्यात आला होता. मुंबईतील फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्यावर जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात आला होता. या मोर्चातूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने पेट घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी आंदोलकांनी आपलं जीवन समर्पित केलं. त्यामुळेच, १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र झाला. 

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०७ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली. या हुतात्मा स्मारकाला दरवर्षी अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दिनी तेथे पोहोचताच. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हुतात्मा स्मारकावर जाऊन अभिवादन केले. 

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठीतून ट्विट करत मराठी माणसांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ''महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो'', असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईमहाराष्ट्रनरेंद्र मोदी