Join us

महाराष्ट्र दिनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा अपमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:52 AM

महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनाच्या समारंभाला मुंबईतील राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना निमंत्रित करण्याचे सामान्य प्रशासनाचे आदेश आहेत

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनाच्या समारंभाला मुंबईतील राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना निमंत्रित करण्याचे सामान्य प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र शालेय शिक्षण विभागाला स्वत:च्याच विभागातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा विसर पडल्याने शिक्षकांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. हा शिक्षकांचा अपमान असल्याचा आरोप शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी केला आहे.शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व विभागाचे संचालक यांच्याकडे याबाबत तक्रार केल्याचे बोरनारे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्याचा ५८वा वर्धापन दिनाचा शासकीय कार्यक्रम १ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क येथे झाला. कार्यक्रमासाठी मुंबईतील मान्यवरांसह राष्ट्रीय, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, अर्जुन पदक प्राप्त क्रीडापट्टू यांना निमंत्रित केले जाते. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने १४ मार्च रोजी लेखी आदेश काढून शालेय शिक्षण सचिवांना सूचना दिल्या. शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी ३ एप्रिलला मुंबईतील शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत शिक्षण संचालकांना कळविले होते. मात्र विभागाच्या निष्काळजीपणामुळे शिक्षकांना निमंत्रणापासून दूर ठेवले.शिक्षण विभागाने निष्काळजीपणा केल्याने राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना निमंत्रणापासून दूर ठेवण्यात आले. हा राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा अपमान असून, शिक्षक परिषदेने शालेय शिक्षण विभागाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.