यदु जोशी।
मुंबई : पंकजा मुंडे आणि विनोद तावडे या दोन माजी मंत्र्यांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले असून त्यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागणारे माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा एकदा पुनर्वसनापासून वंचित राहिले आहेत.
फडणवीस यांचे विरोधक मानले जाणारे, मात्र मतभेदाची कुठेही वाच्यता न करता संयम बाळगणारे विनोद तावडे यांना सचिवपद मिळाले. तावडेंचे राजकारण संपले या धारणेला छेद गेला. विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पंकजा मुंडे पराभूत झाल्या. दोघांना राज्यसभा वा विधान परिषदेचीही संधी मिळाली नाही. औरंगाबादच्या माजी महापौर, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष विजया राहाटकर यांना सचिवपद देण्यात आले. रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेले आणि ईशान्येकडील राज्यांत कार्य केलेले सुनील देवधर यांना सचिवपद मिळाले.उपाध्यक्ष आणि सरचिटणीस ही पक्षसंघटनेत अत्यंत महत्त्वाची पदे मानली जातात. त्यापैकी एकही पद महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले नाही. याआधी राज्यसभेचे सदस्य विनय सहस्रबुद्धे हे उपाध्यक्ष होते. भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुंबईतील खा. पूनम महाजन यांच्या जागी कर्नाटकातील खासदार तेजस्वी प्रताप यांना संधी देण्यात आली आहे.भाजपच्या पक्षसंघटनेत संघटनमंत्री आणि त्यांना साहाय्य करणारे तीन सहसंघटनमंत्री ही महत्त्वाची पदे मानली जातात. ते मूळ संघ प्रचारक असतात. संघ आणि भाजपला जोडणारा दुवा म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. मूळ मराठवाड्याचे असलेले व्ही. सतीश यांना पुन्हा सहसंघटनमंत्री पद देऊन त्यांचे महत्त्व कायम ठेवण्यात आले.
नागपूरकर सिद्दिकी...नागपूरकर जमाल सिद्दिकी यांना राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. ते हज समितीचे सदस्य, राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष होते.पक्षातील नेत्यांवर टीका करणाऱ्यांना पक्षात कोणतेही स्थान दिले जाणार नाही, असा संदेश खडसे यांना यानिमित्ताने भाजप श्रेष्ठींनी दिला, असे मानले जात आहे.राज्यात नवीन प्रभारीमहाराष्ट्राच्या प्रभारी असलेल्या खा. सरोज पांडे यांना पुन्हा सरचिटणीसपद मिळाले नाही. त्यामुळे आता नवे सरचिटणीस महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून येतील.