आदित्य ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 10:51 AM2019-11-10T10:51:33+5:302019-11-10T11:08:06+5:30
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र निकलांनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत आग्रही भूमिका घेतली. पण भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती देण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने अधिकच ताठर भूमिका घेतली होती. त्यामुळे 13 व्या विधानसभेची मुदत संपल्यानंतरही नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री मालाड येथील रिट्रीट हॉटेलला अचानक भेट देत आमदारांसोबत चर्चा केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आमदारांसोबतच हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना आमदारांची आज द रिट्रिट हॉटेलवर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आदित्य ठाकरे हे दुपारी साडेबारा वाजता ही बैठक घेणार असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
राज्यपालांनी भाजपाला संधी दिलीय, त्याचा लाभ घ्यावा https://t.co/JfcaFtPOy1
— Lokmat (@MiLOKMAT) November 10, 2019
राज्यात सरकार स्थापनेवरून संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. राज्यपालांच्या पुढाकारानेच आता राज्याला नवे सरकार मिळू शकते. राज्यपालांनी भाजपाला संधी दिली आहे, त्यांनी याला लाभ घेतला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाने बहुमत सिद्ध करून दाखवावं, असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे.
विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. दरम्यान, राज्यपालांनी भाजपाला दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, ''एकंदरीत परिस्थिती पाहता आता राज्यपालांच्या पुढाकारानेच राज्याला सरकार मिळू शकते. त्यांनी भाजपाला संधी दिली आहे. आता भाजपाने या संधीचा लाभ घेतला पाहिजे. खरंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने यापूर्वीच सरकारस्थापनेसाठी दावा केला पाहिजे होता.''
Shiv Sena leader Sanjay Raut: Agar koi sarkaar banane ko taiyar nahi hai toh Shiv Sena yeh zimma le sakti hai. #Maharashtrapic.twitter.com/hYO1HHbuRq
— ANI (@ANI) November 10, 2019
राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापनेची तयारी आहे की नाही याबाबत 11 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना पहिली संधी मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. भाजपाने यापूर्वी स्पष्ट बहुमत नसतानाही अनेक राज्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी दावा केलेला होता, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच गेल्या 15 दिवसांत भाजपाने सरकार स्थापनेचा दावा काले काला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.