शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरेवरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. गेल्या ५० वर्षांत ठाकरे घराण्यातील कुणीही व्यक्ती प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरली नव्हती. या परंपरेला छेद देत आदित्य यांनी आज शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती, आदित्य यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीची. त्याबद्दल अत्यंत सावध पवित्रा घेत ते या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करताना दिसले.
कॅश, कार, बँक बॅलन्स अन् बरंच काही... आदित्य ठाकरेंची कोटींची संपत्ती प्रथमच जाहीर
आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
१०० टक्के राजकारणाचं सूत्र मांडणारे आदित्य ठाकरे शिवसेनेला कुठे घेऊन जाणार?
आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यात. आपण व्यवसाय करत असल्याचा उल्लेख आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे, पण नेमका कसला व्यवसाय करतात, याचा खुलासा केलेला नाही. या संदर्भात वृत्तवाहिन्यांनी त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा आदित्य यांनी, शिवसैनिक हीच आमची खरी संपत्ती असल्याचं सांगत वेळ मारून नेली.
आदित्यसाठी 'मनसे'नं मतदारसंघ सोडला, तर उद्धव ठाकरेंनी 'राज' समर्थक फोडला
आदित्य ठाकरे म्हणाले, 'संपत्ती अमाप आहेच. मी जिथे जिथे गेलो तिथे लोकांनी माझं स्वागत केलं. लोकांचं हे प्रेम मोजायचं कसं? हीच आमची खरी संपत्ती आहे. ही संपत्ती मोजता येत नसल्यानंच बहुधा माझ्या आजोबांनी निवडणूक लढवली नसेल.'
Vidhan Sabha 2019: ...अन् बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन आदित्य ठाकरे झाले नतमस्तक!
अर्थात, आदित्य ठाकरे यांनी विषय टाळला असला तरी त्यांच्या संपत्तीची चवीनं चर्चा होणार आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्तीनं संपत्ती जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.