- स्नेहा मोरे
मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळीचा मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने सर्वांचेच या मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिले होते. गुरुवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला अन् वरळीकरांनी आदित्य ठाकरे यांना कौल दिला. गुरुवारी सकाळपासून पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांच्याविरोधात ठाकरे यांनी मतांची आघाडी मिळविली आणि ८९ हजार २४८ मते मिळवून विजयावर शिक्कामोर्तब केले.
ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरविले होते. या मतदारसंघातील लढाई ही आदित्य ठाकरेंसाठी खरे तर सोपा पेपर होता. त्यात ते अपेक्षेप्रमाणे उत्तीर्णही झाले आहेत. या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरे यांना ८९ हजार २४८ मते मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांना २१ हजार ८२१ मते मिळाली. आदित्य ठाकरे ६७ हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले.
विशेष म्हणजे, या मतदारसंघात ६,५०० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. शिवसेनेने वरळीचा गड राखण्यासाठी निवडणुकीपूर्वी रणनीती आखली होती, त्यासाठी स्थानिक नगरसेवकांना कामालाही लावले होते. याखेरीज, विद्यमान आमदार सुनील शिंदे हेदेखील शिवसेनेचेच असल्याने त्याचाही फायदा ठाकरे यांना झाला. ठाकरे यांच्यासमोर पूर्वीचे राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांचे आव्हान होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच त्यांनी सेनेत प्रवेश केल्याने या मतदारसंघातील मताधिक्य वाढण्याची शक्यता अधिक गडद झाली. शिवसेनेचा गड असलेल्या वरळीमधून २००९ ची विधानसभा निवडणूक सोडली, तर सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे.
शिवसेनेचा वाघ आला... निवडणूक कार्यालयाबाहेर जल्लोष
गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास आदित्य ठाकरे यांच्या विजयाची निश्चिती झाल्यानंतर हळूहळू कार्यालयाबाहेरील परिसरात शिवसैनिकांनी जमण्यास सुरुवात केली. याखेरीज, वरळी नाका आणि लोअर परळ येथील शाखांबाहेरही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आदित्य ठाकरे यांचा विजय साजरा केला. सायंकाळी पाच वाजता ठाकरेंनी प्रमाणपत्र घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात हजेरी लावल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा दिल्या. ठाकरे यांच्यासह विद्यमान आमदार सुनील शिंदे, सेनेचे नेते सचिन अहिर, धाकटे बंधू तेजस ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थिती दर्शवून विजयाचा आनंद साजरा केला. सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांसह निवडणूक कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती.
या विजयाकरिता वरळीकरांचे मन:पूर्वक आभार मानतो. नव्या महाराष्ट्रासाठी अनेक नव्या कृतिशील योजना आहेत. आता या विजयानंतर सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा विकास साधायचा आहे. त्यामुळे आता नव्या जोमाने आणि ताकदीने कामाला लागणार आहे. मतदारांनी दिलेली ही नवी जबाबदारी अतिशय चोखपणे बजावणार आहे.
शिवसेनेचा दावा फोल
शिवसेनेकडून वरळी विधानसभा एक-सवा लाख मतांच्या फरकाने जिंकू, असा दावा केला जात होता. मात्र, आदित्य ठाकरे यांना केवळ ९० हजारांच्या आसपास मते मिळाली आहेत, त्यामुळे लाखांचा फरक तर दूरच राहिला.