Join us

Maharashtra Election 2019 : दादा बदलले की...

By यदू जोशी | Published: October 09, 2019 4:30 AM

सध्या दोन दादा आहेत, एक अजितदादा आणि दुसरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा (पाटील).

- यदु जोशीमहाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी एकच दादा होते ते म्हणजे वसंतदादा पाटील. त्यानंतर एक गॅप गेली आणि नवीन दादा आले, अजितदादा! सध्या दोन दादा आहेत, एक अजितदादा आणि दुसरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा (पाटील). या पवार, पाटलांच्या स्वभावात जमीन अस्मानचा फरक आहे. आजचा विषय अजितदादांचा आणि विशेषत: गेल्या काही दिवसांत त्यांच्यात घडलेल्या बदलांचा आहे.अलिकडे त्यांनी तावातावात आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. दुसऱ्या दिवशीच्या पत्रपरिषदेत दादा ज्या सौजन्यानं पत्रकारांशी बोलले त्यावरून, हेच का ते दादा असा प्रश्न पडला. चारवेळा तर ते, ‘माझ्या पत्रकार बंधु-भगिनींनो’ असं म्हणाले. पत्रकारांशी इतक्या सौजन्यानं बोलताना दादांना आधी कोणी पाहिलं नसेल. मागे नांदेड जिल्ह्यातील लोहामध्ये सभेत बोलताना, ‘या दंडुकेवाल्याना सोट्यानं हाणलं पाहिजे’, अशा शेलक्या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला होता. परवा बारामतीत अर्ज भरल्यानंतर, ‘एक शेवटचा प्रश्न’, असं एका पत्रकारानं म्हणताच दादा स्मित हसले (मुळात दादा हसले हीदेखील बातमीच आहे) आणि म्हणाले, ‘नक्की शेवटचा ना? मग विचारा’.आधीचे दादा असते तर ‘हे काय लावलंय शेवटचं, शेवटचं’ असं म्हणून त्यांनी आम्हाला काय दुसरी काम नाहीत का असा भाव चेहºयावर आणून पत्रकारांना धुडकावून लावलं असतं. दादांनी आक्रमक स्वभावाला मुरड तर घातली नाही ना? की नियतीनं दादांना सौम्य केलं? राष्ट्रवादीच्या सध्याच्या अवस्थेत आणि राजकारणाच्या बदलत्या ट्रेंडमध्ये पूर्वीची उद्दामपणाकडे झुकणारी आक्रमकता चालणार नाही हे त्यांच्या कदाचित लक्षात आलं असावं. राष्ट्रवादी हा टग्यांचा पक्ष अन् त्या टग्यांचे शिरोमणी अजित पवार, असं चित्र गेली काही वर्षे रंगविलं गेलं. काही अंशी त्याला वास्तवाची किनार ही होतीच. अजितदादा फटकळ स्वभावाचे असल्यानं त्यांना टगेगिरीचं लेबल लावणं विरोधकांना (पक्षांतर्गतदेखील) सोपं गेलं. त्या स्वभावाला आता दादांनी जाणीवपूर्वक वेसण घालणं सुरू केलंय असं दिसतं. ही राजकीय अपरिहार्यता आहे की नियतीनं त्यांना नम्र केलंय?प्रत्यक्षाहून प्रतिमा वेगळी असंही दादांबाबत अनेकदा घडलंय. ते माणूसघाणे आहेत असं म्हणणऱ्यांनी सकाळी १० पर्यंत त्यांना स्वत:ला किती लोक भेटायला येतात ते बघावं आणि दादांकडे वेळ घेऊन आलेले दीडएकशे लोक सकाळी ८ ला येऊन बसलेले असतात हेही बघावं. सार्वजनिक हितापासून हजारोंची वैयक्तिक कामंही दादांनी केली पण त्यांचं मार्केटिंग केलं नाही. त्यांच्याकडे काम घेऊन गेलेली व्यक्ती सहसा विन्मुख परतत नाही, पण बाहेर चर्चा होत राहते ती दादांनी अमूक कार्यकर्त्याला कसं झापलं, कसं सुनावलं इथपासून त्यांच्या धरणापर्यंतच्या विधानांचीच. रंगविली जाणारी नकारात्मक प्रतिमा सकारात्मक करण्याची पहिली जबाबदारी आपली स्वत:ची आहे, याचं भान आता दादांना आलेलं दिसतंय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात की पूर्वी दादांसमोर जायचं म्हटलं तर भीती वाटायची; पण आता,‘एक सेल्फी काढू कां, म्हटलं तरी ते पटकन जवळ घेऊन सेल्फी काढू देतात. हा मोठा फरक आहे. वटवृक्षाखाली लहान झाडं वाढत नाहीत म्हणतात. दादांचं तसंही काहीसं झालंय पण तरीही दादा दादाच आहेत. परवाचा त्यांचा राजीनामा हे राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबातील पेल्यातलं वादळ ठरलं नसतं तर पक्ष आणि कुटुंबालाही दादांची खरी ताकद कळली असती.

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019