Join us

Maharashtra Election 2019 : मी म्हटलं होतं, 'हवा बदलतेय'; पवारांच्या 'त्या' सभेनंतर अजितदादांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 2:37 PM

Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारसभा राज्यभर सुरू आहेत.

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारसभा राज्यभर सुरू आहेत. पावसाची तमा न बाळगता ते उमेदवारांसाठी नेटानं प्रचार करतायत. पायाला जखमा असतानाही वयाच्या 80व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे साताऱ्यात भर पावसात उपस्थितांनाही पवारांनी संबोधित केलं. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. उतार वयातही तरुणांना लाजवेल असा प्रचार करणाऱ्या पवारांच्या फोटोनं समाज माध्यमातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.शरद पवार वाऱ्याची दिशा ओळखतात हे मोदींनी केलेलं विधान पवारांना तंतोतंत लागू पडते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, मी म्हटलं होतं, 'हवा बदलतेय'! याची प्रचिती आता सर्वांनाच आली. कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्येही आदरणीय साहेबांनी सातारकरांना संबोधित केलं. उसळलेल्या अलोट जनसागरानं तितक्याच आत्मीयतेनं साहेबांच्या हाकेला प्रतिसाद दिला. असलं ऊर्जावान नेतृत्व आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्यच! अजित पवारांच्या या विधानानंतर आघाडीच्या बाजूनं सुप्त लाट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तत्पूर्वी भरपावसात काल रात्री 8 वाजता पवारांची साताऱ्यात सभा सुरू होती. या सभेला व्यासपीठावर पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत होते. पवारांचं हे रूप पाहून सातारकर भारावले होते, तसेच पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता. पावसात भिजत उपस्थित नागरिकांनीही सभेला गर्दी केली होती. आपल्या खिशातील रुमाल काढून, डोक्यावर छत्री घेऊन कार्यकर्त्यांनी सभेला प्रतिसाद दिला. 

 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019