Join us  

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 3:16 PM

राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

मुंबई - राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी (23 ऑक्टोबर) दिली आहे. मतमोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजता होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 269 ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. 

एका मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबल साठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर) आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात. मतदार संघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) बारकोडद्वारे मोजली जाईल. टपाली मतेही सुरुवातीला मोजली जातील.

सरासरी प्रत्येक टेबलला एक मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला संगणकीय पद्धतीने आकडेवारी भरण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम ने आन करण्यासाठी एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे. स्ट्राँग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्राँग रूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाईल.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील.  सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या eciresults.nic.in या संकेतस्थळावर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदान