आधी भरला अर्ज, त्यानंतरच शक्तिप्रदर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 06:56 AM2019-10-05T06:56:16+5:302019-10-05T06:56:36+5:30

भांडुप विधानसभामधून तिकीट नाकारल्याने विद्यमान आमदार अशोक पाटील यांनी मातोश्री गाठली. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याने त्यांनी मातोश्रीबाहेरच ठिय्या केला.

 Maharashtra Election 2019 :Apply first, then showcase the power! | आधी भरला अर्ज, त्यानंतरच शक्तिप्रदर्शन!

आधी भरला अर्ज, त्यानंतरच शक्तिप्रदर्शन!

Next

मुंबई : भांडुप विधानसभामधून तिकीट नाकारल्याने विद्यमान आमदार अशोक पाटील यांनी मातोश्री गाठली. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याने त्यांनी मातोश्रीबाहेरच ठिय्या केला. अखेर, पोलीस वाहनात बसवून त्यांना तेथून हटविण्यात आले. मात्र, या प्रकारानंतर तिकीट पुन्हा धोक्यात येऊ नये म्हणून शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले रमेश कोरगावकर यांनी सकाळी कार्यालय उघडताच सर्वप्रथम अर्ज भरला, नंतर शक्तिप्रदर्शन करत निवडणूक कार्यालय गाठले.
भांडुप विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून रमेश कोरगावकर यांना संधी मिळाली. याबाबत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मी सच्चा शिवसैनिक आहे. भांडुपमध्ये सेनेचा गड तयार केला. मात्र, सेनेचे अच्छे दिन आल्यामुळे, माझ्यासारख्या शिवसैनिकाला डावलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या पैशाला किती महत्त्व असते हे या उमेदवारीवरून समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले.
मला सकाळपासून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी म्हणून पक्षातीलच वरिष्ठांनी फोन करून सांगितले. मात्र, मी कुठेही जाणार नाही. त्यातही, माझे नेमके काय चुकले हे विचारण्यासाठी मातोश्रीवर गेलो. तिथे साधी विचारपूस तर दूरच आम्हाला पाच तास ताटकळत ठेवून रात्री दोनच्या सुमारास पोलीस वाहनात बसवून हटविण्यात आले. याचेच जास्त दु:ख होत आहे. त्यात उमेदवारी दिलेला उमेदवार नववी पास आहे. पुढे काय आणि कसे प्रश्न मांडणार याची चिंता वाटते. आजही उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी कळविले नाही. दारातून मिरवणूक गेली. मात्र घरी येऊन साधी विचारणाही केली नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.
तर दुसरीकडे पाटील यांच्या नाराजीबाबत कोरगावकर यांना विचारताच, ‘यापूर्वी त्यांना संधी मिळाली. आज मला मिळाली. त्यामुळे नाराजीचा विषयच नाही. त्यात सगळे शिवसैनिक माझ्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अखेरच्या क्षणाला ए/बी फॉर्म हाती पडला खरा, मात्र त्यानंतर विद्यमान आमदारांच्या नाराजीच्या सुरामुळे यंदाही फॉर्म निसटू नये म्हणून सावधगिरी बाळगत कोरगावकर यांनी सकाळी कार्यालय उघडताच आधी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारच्या सुमारास पदयात्रा काढली. या वेळी पाटील त्यांच्या पदयात्रेत सहभागी झाले नाहीत. पुढे कोरगावकर पुन्हा निवडणूक कार्यालयात धडकल्याने कर्मचारीही थोडेसे गोंधळले होते. मात्र आतच फेरफटका मारून ते तेथून निघाले.
मात्र या सर्व नाराजीनाट्यामुळे पक्षांतर्गत उमेदवारीसाठीचे मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. ते दूर करून पक्ष संघटन अधिक चांगल्याप्रकारे मजबूत करून नाराजांना एकत्र आणण्याचे आव्हांना बहुसंख्य पक्षांसमोर आहे.

Web Title:  Maharashtra Election 2019 :Apply first, then showcase the power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.