बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ वापरुन विरोधकांची आदित्यवर टीका; म्हणाले की...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:31 PM2019-10-03T15:31:36+5:302019-10-03T15:40:37+5:30
वरळी विधानसभा निवडणूक 2019: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्टकरुन शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. नवा महाराष्ट्र घडविण्याची टॅगलाईन घेऊन आदित्य ठाकरेंनी प्रचाराचा शुभारंभ केला मात्र मतदारसंघात शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत भर पडली आहे.
मराठी माणसांच्या हक्कासाठी निर्माण झालेल्या शिवसेनेला मराठीचा विसर पडू लागला की असा प्रश्न उपस्थित झाला. आदित्य ठाकरेंच्या प्रचाराला शिवसेनेने मराठी, गुजराती, तेलगू आणि उर्दू अशा विविध भाषांमध्ये पोस्टर्स लावले होते. मात्र अनेक स्तरातून शिवसेनेने लावलेल्या या बॅनर्सवरुन मराठी लोकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. विरोधकांकडूनही आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्टकरुन शिवसेनेवर टीका केली आहे. राजकीय फायद्यासाठी अजून किती लाचार होणार? अशा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला विचारलेला आहे. या व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे म्हणतात की, मराठी ही आपली मातृभाषा आहे, ती बोललंच पाहिजे, मानलीच पाहिजे. भैय्या भेटला तरी चालेल मराठीत बोला असं बाळासाहेब ठाकरेंनी ठणकावून सांगितले होते.
राजकीय फायद्यासाठी अजून किती लाचार होणार?@AUThackeray@ShivSena@OfficeofUT#AssemblyElections2019#MaharashtraElections2019#MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/qHkaRPwtEX
— NCP (@NCPspeaks) October 2, 2019
वरळीमध्ये मराठी मतदारांसोबतच इतर भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसून येत आहे. यासाठी शिवसेनेने वरळी मतदारसंघात मोठे मोठे होर्डिंग्स लावण्यात आले होते. यात विशेष म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत लावलेल्या या होर्डिंग्समुळे आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर हाच का शिवसेनेचा मराठी बाणा असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे शिवसेनेने असं का केलं नेमकं त्यांना या कॅम्पेनद्वारे काय सांगायचे आहे, हे येत्या 24 तासांत मुंबईकरांना समजणार आहे असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले होते.
आज आदित्य ठाकरेंनी वरळीतून उमेदवारी अर्ज भरला, उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.