मुंबई : कुलाबा मतदारसंघातील उमेदवार आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ईव्हीएमविरोधात तक्रार दाखल केली आहे. तब्बल १८ सील केलेले ईव्हीएम स्ट्राँग रूमऐवजी दुसरीकडे ठेवण्यात आले होते. तर, मॉक पोल झालेल्या १५ ईव्हीएमची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी आवश्यक असते. मात्र, आयोगाच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना याबाबत माहितीच देण्यात आली नव्हती. पडताळणीपूर्वीच ८ ते ९ मशीन सील करण्यात आल्या होत्या. या सर्व प्रकाराचा खुलासा आयोगाने करायला हवा, अशी मागणी जगताप यांनी केली.
सत्ताधारी भाजप, शिवसेनेने ईव्हीएममध्ये गडबड करायची योजनाच तयार ठेवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एका ईव्हीएममध्ये १४०० मते असतात. त्यामुळे १८ सील केलेले ईव्हीएम भलतीकडेच ठेवल्याने तब्बल २५ हजार मतांमध्ये फेरफार करणे शक्य होते. याबाबत माझ्या निवडणूक प्रतिनिधीने तक्रार दाखल केली आहे. ईव्हीएमबाबतची ही शंका भारतीय लोकशाहीला गालबोट लावणारी आहे.
विविध पक्षांनी यावर शंका घेतली आहे. न्यायालयातही याचिका आहेत. याबाबतची शंका दूर करण्यासाठी निकालानंतर युतीचे उमेदवार निवडून आलेल्या फक्त २५ जागांवर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. यातला निकाल आणि ईव्हीएमचा निकाल सारखा लागल्यास परत आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार नाही. मी स्वत: सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेईन, असेही जगताप म्हणाले.