दिग्गज उतरले निवडणुकीच्या रिंगणात; नसीम खान, दिलीप लांडे, राम कदमसह पराग अळवणी यांचे अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:52 AM2019-10-04T03:52:08+5:302019-10-04T03:52:29+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी चांदिवली, विलेपार्ले आणि घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी चांदिवली, विलेपार्ले आणि घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दिलीप लांडे, राम कदम या नावांचा त्यात समावेश आहे.
चांदिवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार सिराज खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन, भाजपचे आमदार राम कदम, भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे या चार मोजक्या नावांनी घाटकोपर पश्चिम विधानसभा गाजवली आहे. पक्षांतर्गत कलह, राजकीय गटबाजी, प्रतिस्पर्ध्यांची राजकीय खेळी आणि मग मतदार राजाचा कौल; या प्रमुख घटकांचा फटका या चारही नावांना यापूर्वी बसला आहे. सध्या येथे भाजपचे राम कदम हे आमदार आहेत.
पाऊस, ऊन आणि बरंच काही...
नसीम खान, दिलीप लांडे आणि सिराज खान हे तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी विद्याविहार येथे आले असतानाच पावसाने धुमाकूळ घातला होता. दुपारी १२ वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत येथे कोसळत असलेल्या पावसात कार्यकर्त्यांचे हाल झाले. तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता. तिन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून आपआपल्या उमेदवाराच्या नावाचा जयघोष केला जात होता.
दिपाली सय्यद शिवसेनेत
अभिनेत्री दिपाली सय्यद हिने शिवसेनेत प्रवेश केला आहे तिला मुंब्रा-कळवा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे़ जितेंद्र आव्हाड यांच्याशी तिची लढत होणार आहे़
अर्ज भरताना ज्येष्ठांची उपस्थितीती
भायखळा मतदारसंघातून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. या वेळी, त्यांचे पती पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते.
कांदिवली पूर्वमधून भाजपचे विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला, तर त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने या मतदारसंघातून अजंता यादव यांना तिकीट दिले आहे. मनसेने विभाग अध्यक्ष हेमंत कांबळे यांना तिकीट दिले आहे.
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय (आ.)-रासप महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.