Join us

Maharashtra Election 2019: बिर्याणी, समोसा, आपला नंबर लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 2:12 AM

Maharashtra Election 2019: उमेदवाराचा प्रचार-प्रसार व शेवटचे मतदान होईपर्यंत उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या धाकधुकीने चांदिवली, घाटकोपर पश्चिम व विलेपार्ले विधानसभा गाजली. निमित्त होते ते; सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे.

मुंबई : उमेदवारांसोबत घोळक्याने फिरत असलेले कार्यकर्ते, शिवसेनेच्या शाखांमध्ये सुरू असलेली लगबग, मतदारयाद्यांतील नावे शोधण्यापासून ओळखपत्र शोधण्यापर्यंतच्या सुरू असलेल्या वेगवान हालचाली, पक्षनिहाय टेबलवर सुरू असलेला गोंधळ, मतदान केंद्राबाहेर तैनात असलेली चोख सुरक्षा व्यवस्था, ‘ताई, माई, अक्का...आपला नंबर लक्षात ठेवा...’ असा सुरू असलेला उमेदवारांच्या समर्थकांचा मौखिक प्रचार, दुपारच्या क्षणभर विश्रांतीदरम्यान कार्यकर्त्यांच्या पोटात गेलेले बिर्याणीचे दोन घास, पुन्हा सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू झालेला उमेदवाराचा प्रचार-प्रसार व शेवटचे मतदान होईपर्यंत उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या धाकधुकीने चांदिवली, घाटकोपर पश्चिम व विलेपार्ले विधानसभा गाजली. निमित्त होते ते; सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे.

विलेपार्ल्यातील भाजपचे उमेदवार पराग अळवणी, चांदिवलीचे काँग्रेसचे उमेदवार नसीम खान आणि घाटकोपर पश्चिमेतील भाजपचे उमेदवार राम कदम या विद्यमान आमदारांसह त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी सोमवारी सकाळीच मतदान केले.

चांदिवली येथील संदेशनगरसमोरील महापालिकेच्या शाळेत दुपार वगळता सकाळसह सायंकाळी मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. काळे मार्ग या मुख्य रस्त्यालगत हे मतदान केंद्र असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरावर गैरप्रकार होणार नाही, याची खबरदारी घेतली जात होती. दिव्यांसाठी येथे व्हीलचेअरची व्यवस्था होती; स्वयंसेवकामार्फत व्हीलचेअरहून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेले जात होते. येथील बैल बाजारमधील मगन नथुराम मार्गावरील महापालिकेच्या शाळेत मतदानासाठी मतदारांच्या सकाळी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. येथील सहा रांगाचे नियोजन करण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी तैनात होते. परिणामी, त्यांची थोडी तारांबळ उडत होती.

मतदारांनी केली गर्दी

चांदिवलीतील संघर्षनगरमध्ये मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी उतरले होते. सकाळसह, दुपारी आणि सायंकाळी येथील ‘पवार पब्लिक स्कूल’ या मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी असल्याचे पाहण्यास मिळाली.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदान