Maharashtra Election 2019: बोरिवलीतील भाजप कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य संपुष्टात; अपक्ष उमेदवाराची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 07:12 PM2019-10-06T19:12:21+5:302019-10-06T19:12:59+5:30
बोरिवली विधानसभा निवडणूक २०१९ - विनोद तावडे यांना डावलून पक्षाकडून महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी दीपक पाटणेकर यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरून घेतला होता
मुंबई - बोरिवली मतदारसंघामध्ये विनोद तावडे यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या नाराजीतून अपक्ष उमेदवार उभा करीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील राणे याना पाठिंबा न देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र विनोद तावडे यांना कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळाले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्याकरिता बोरिवलीतील सर्व जिल्हा, विधानसभा, वॉर्ड पदाधिकारी, सर्व बुथ प्रमुख, लोकप्रतिनिधी व सर्व कार्यकर्ते यांची तातडीची बैठक रविवारी महिला आधार भवन येथे बोलाविण्यात आली होती. यावेळी स्वतः विनोद तावडे, बोरिवली जिल्हाध्यक्ष दीपक पाटणेकर, सुनील राणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विनोद तावडे यांना डावलून पक्षाकडून महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी दीपक पाटणेकर यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरून घेतला आणि कार्यकर्त्यांची ताकद सुनील राणे यांच्या पाठीशी उभी न करता त्यांच्या पाठीशी उभी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कार्यकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांची यशस्वी मनधरणी करण्यात विनोद तावडे यांना यश मिळाले आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा सुनील राणे यांना देण्याचा निर्णय घेत प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर मुंबईमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला, याठिकाणी दहिसर, गोरेगाव, बोरिवली या मतदारसंघात भाजपाचे आमदार युती नसतानाही निवडून आले होते. बोरिवली मतदारसंघ हा भाजपाचा गड मानला जातो. 1980 पासून या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रत्येक विधानसभा निवडणुकीत निवडून येतो. त्यामुळे भाजपाच्या दृष्टीने बोरिवली मतदारसंघ सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. बोरिवली विधानसभेचं नेतृत्व राम नाईक, हेमेंद्र मेहता आणि त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी केलं आहे.
2004 च्या निवडणुकीत पहिल्यांदा गोपाळ शेट्टी बोरिवली मतदारसंघातून 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. तर 2009 च्या निवडणुकीतही गोपाळ शेट्टी यांनी मतदारसंघात बाजी मारली होती. बोरिवली हा मतदारसंघ पाहिला तर, या मतदारसंघात मराठी भाषिकांसोबत गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही लक्षणीय आहे. प्रामुख्याने हा समाज वर्षोनुवर्षे भाजपाला मानणारा आहे. 2009 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच या मतदारसंघात मनसेने आपला उमेदवार दिला होता. त्यावेळी भाजपापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मते या मतदारसंघात मनसेला मिळाली होती.