मुंबई - मावळत्या विधानसभेची मुदत संपत आली असली तरी राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपा आणि शिवसेना आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने राज्यातील सत्तासमीकरणांचा गुंता अधिकच जटील झाला आहे. दरम्यान राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. भाजपा आणि शिवसेना राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटत आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतरही जो राजकीय पेच निर्माण झाला आहे तो योग्य नाही. स्पष्ट बहुमतानंतरही भाजपा आणि शिवसेना राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं पाप भाजपा आणि शिवसेना करत आहेत.'' दरम्यान, नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील शेतकरी संकटात असताना, अशी अस्थिरता कायम राहणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी होणार का, अशी विचारणा केली असता अशी शक्यता धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावली. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे. काल शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहोत.
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेना राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटतेय, धनंजय मुंडेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 5:46 PM