Maharashtra Election 2019 : भाजपने रासपला धोका दिला - महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 05:05 AM2019-10-08T05:05:02+5:302019-10-08T05:10:02+5:30
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षावर अन्याय झाला आहे. भाजपने आमच्यासोबत धोका केला. जागावाटपात आम्हाला दोन जागा ...
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षावर अन्याय झाला आहे. भाजपने आमच्यासोबत धोका केला. जागावाटपात आम्हाला दोन जागा सोडण्यात आल्या. मात्र, या दोन्ही जागांवरील उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याने ते आमचे राहिले नाहीत, अशी भूमिका रासप नेते महादेव जानकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. मात्र, स्वाभिमानासाठी महायुतीतच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
रासपच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जानकर म्हणाले की, रासपचे उमेदवार आमच्याच चिन्हावर लढतील असे ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी तसे कबूलही केले होते. मात्र, दौंडचे उमेदवार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांनी भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरले. ते कमळाच्या चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना रासपमधून बेदखल केल्याचे त्यांनी सांगितले. गंगाखेडची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र, तिथे आमचा उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनीही अर्ज भरला आहे. ते आता रासपचे अधिकृत उमेदवार आहेत. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उमेदवाराला माघार घ्यायला लावावे, असेही ते म्हणाले.
आम्हाला मदत करा
या टप्प्यावर आम्ही महायुतीतून बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही. महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच आम्ही लढणार आहोत. गंगाखेडच्या जागेवर शिवसेना, भाजपने आम्हाला मदत करावी, उर्वरित २८७ जागांवर मी महायुतीला मदत करेन. जिंतूर आणि दौंडमधील भाजपच्या उमेदवारांना मदत करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक कार्यकर्ते घेतील, असेही जानकर म्हणाले.