मुंबई: राज्यात आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेत अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंज शिंदे यांच्याकडे या विषयावरील सुनावणी सुरु होती. या सुनावणी नंतर अखेर निवडणुक अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज मंजूर केला आहे.
शिर्डी विधानसभेच्या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांनी अर्जामध्ये स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे 3 असे एकुण 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी केला होता. त्यामुळे संबंधित प्रकाराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर आज निवडणुक अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज वैध ठरवला आहे.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला होता. ज्या वकिलांकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आलं, त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 मध्येच संपला असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यामुळे निवडणुक अधिकाऱ्यांने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाजूने निर्णय दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपाला देखील दिलासा मिळला आहे.