- मनोहर कुंभेजकरमुंबई: राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती व विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांचे नाव निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यांना पक्षाने एबी दिल्याची माहिती असून आज दुपारी शक्तिप्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे समजते.बोरिवलीचे माजी आमदार हेमेंद्र मेहता व भाजपाकडून चार वेळा नगरसेवकपद भूषवणारे प्रवीण शाह यांची नावे चर्चेत आहेत अशी विश्वसनीय माहिती आहे. दरेकर यांना मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. मात्र हा मतदार संघ शिवसेनेला मिळाला. विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्याचे निश्चित झाल्यावर दरेकर यांनी येथून तिकीट मिळण्यासाठी मोर्चेबांधणी केली. काल दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बरोबर चर्चा झाली. त्यावेळी बोरिवली मधून दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.भाजपाच्या पहिल्या यादीत तसेच दुसऱ्या यादीत आणि काल जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीतही विनोद तावडे यांचे नावच नव्हते. त्यामुळे तावडे यांचे काय होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात राज्यात व मुंबईत आहे. तावडे यांच्या कार्यपद्धतीवर पक्ष श्रेष्ठींमध्ये व संघपरिवार नाराजी होती. गेल्या बुधवारी सकाळी तिकीटाबद्धल तावडे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे तावडे निघून गेले. मग त्यांच्या समर्थकांनी पाटील यांच्या बंगल्यासमोर त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. त्यामुळे विनोद तावडे यांना विधानसभेचे तिकीट मिळणार का, अशी देखिल जोरदार चर्चा आहे.