मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागलेला असताना भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा प्रचारासाठी भन्नाट आयडिया शोधून आणली आहे. रम्याचे डोस या काल्पनिक चित्रांच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करणारा रम्या आता कवितेच्या माध्यमातून विरोधकांची खिल्ली उडवित आहे. रम्याचे डोसच्या माध्यमातून भाजपानेमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपाने रम्याच्या माध्यमातून कवितेतं म्हटलं आहे की, इंजिनदादा इंजिनदादा किती आवाज करता, कोळसा किती जाळता अन् धूर किती काढता, रुळचं नाही खाली पण स्वभाव तुमचा हट्टी, जागच्या जागी धूसपूस करतात वाजवतात शिट्टी, डबे तुम्हाला सोडून जातात एकटे मागे उरतात, इंजिनदादा इंजिनदादा किती आवाज करता, ''लाव रे तो व्हिडिओ'' म्हणता आणि लोक तिथे जमतात, तुमच्या नकाला पाहून हसून टाळ्या देतात मात्र मत देत नाही असं म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना राज्यात प्रचाराची रणधुमाळी उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी राजकीय पक्ष सोडत नसल्याचं दिसत आहे. यात आघाडी घेतली आहे ती सत्ताधारी भाजपा पक्षाने. भारतीय जनता पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रम्या नावाचं काल्पनिक पात्र उभं केलं आहे. त्यामाध्यमातून विरोधकांवर निशाणा साधण्याचं काम भाजपाकडून करण्यात येतं आहे.