मित्रपक्षांच्या हाती कमळ देत भाजप लढविणार १६४ जागा, रिपाइं, रासप, रयत क्रांतीच्या अस्तित्वाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 04:49 AM2019-10-04T04:49:36+5:302019-10-04T04:49:48+5:30

शिवसेना १२४, भाजप १४६ आणि मित्रपक्ष १८ जागा लढणार असे सांगण्यात आले असले तरी मित्रपक्षाचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याने भाजपच्या वाट्याला प्रत्यक्षात १६४ जागा आल्या आहेत.

Maharashtra Election 2019: BJP will contest 164 Seats | मित्रपक्षांच्या हाती कमळ देत भाजप लढविणार १६४ जागा, रिपाइं, रासप, रयत क्रांतीच्या अस्तित्वाचा प्रश्न

मित्रपक्षांच्या हाती कमळ देत भाजप लढविणार १६४ जागा, रिपाइं, रासप, रयत क्रांतीच्या अस्तित्वाचा प्रश्न

Next

- यदु जोशी
मुंबई : शिवसेना १२४, भाजप १४६ आणि मित्रपक्ष १८ जागा लढणार असे सांगण्यात आले असले तरी मित्रपक्षाचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याने भाजपच्या वाट्याला प्रत्यक्षात १६४ जागा आल्या आहेत. दुसरीकडे रामदास आठवले यांचा रिपाइं, महादेव जानकरांचा रासप, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आणि विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे अस्तित्वच या निवडणुकीत संपुष्टात आले आहे.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला पंढरपूर आणि अक्कलकोट अशा दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. दोन्ही उमेदवार कमळ चिन्हावरच लढणार आहेत. विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामला तीन जागा मिळाल्या आहेत.
वर्सोवामध्ये भाजप आमदार भारती लव्हेकर यांना शिवसंग्रामच्या कोट्यातून उमेदवारी मिळाली आहे. दुसरी जागा ही बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीची असून तेथे श्वेता महाले भाजपच्या उमेदवार आहेत. भाजपच्या उमेदवार यादीत त्यांचे नाव आहे. किनवटमध्ये माजी आमदार भीमराव केराम हे शिवसंग्रामचे उमेदवार असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी आज भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरला.

मित्र पक्षांकडून केल्या जात असलेल्या दाव्यानुसार रयत क्रांती संघटनेला दोन, शिवसंग्रामला तीन, रासपला दोन तर रिपाइंला पाच जागा मिळाल्या आहेत. मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर हा मतदारसंघ रिपाइंला सुटला असून पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रत्यक्षात ही जागा शिवसेनेला मिळालेल्या १२४ जागांपैकी एक असून शिवसेनेने तेथे विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ती रिपाइंला मिळण्याची शक्यता कमीच आहे. भंडारामध्ये अरविंद भालाधरे हे रिपाइंचे उमेदवार असले तरी ते भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि कमळावरच लढणार आहेत. पाथरीमध्ये आ.मोहन फड, नायगावमध्ये राजेश पवार, माळशिरसमध्ये डॉ.विवेक गुजर आणि फलटणमध्ये दिगंबर आगवणे यांना रिपाइंच्या कोट्यातून उमेदवारी दिल्याचे पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले पण तेही कमळावरच भाग्य अजमावणार आहेत. फलटणमध्ये दीपक निकाळजे यांच्याऐवजी आगवणे उमेदवार असतील.

छोट्या पक्षांच्या जागा

रासपच्या दोन्ही उमेदवारांची (आ.राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर) कमळावरच लढण्याची इच्छा आहे. सूत्रांनी सांगितले की पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे मंत्री महादेव जानकर मात्र त्यांनी रासपच्या चिन्हावर लढावे यासाठी आग्रह धरला आहे.
रयत क्रांती संघटना - पंढरपूर, अक्कलकोट. शिवसंग्राम - चिखली, वर्सोवा, किनवट. रासप - दौंड, जिंतूर. रिपाइं - माळशिरस, फलटण, पाथरी, नायगाव, भंडारा, मानखुर्द शिवाजीनगर.
 

Web Title: Maharashtra Election 2019: BJP will contest 164 Seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.