मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळू नये वेळेप्रसंगी विरोधी पक्षात बसू असं षडयंत्र भाजपाचं शिवसेनेविरोधात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे देशद्रोही नाही, सर्व पक्षाचे अन् नेत्यांचे राज्यासाठी आणि देशासाठी योगदान राहिलं आहे. सगळ्या नेत्यांच्या एकमेकांशी संवाद सुरु आहे. राजकीय स्थितीचं भान सगळ्यांना आहे. हे महाराष्ट्र राज्य आमचं आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे ही राजधानी ताब्यात राहावी असं कारस्थान सुरु आहे असाही आरोप संजय राऊतांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाचं निवेदन दुख:द अन् खेदजनक आहे. राज्यात स्थिर सरकार देण्याची जबाबदारी भाजपाची होती. ज्यांनी खोटेपणा, अहंकारातून राज्याला अशा परिस्थितीत ढकललं ते जबाबदार आहेत. शिवसेनेवर खापर फोडणं चुकीचं आहे, भाजपाने शिवसेनेला दोष देऊ नये. महाराष्ट्रातील जनतेप्रती त्यांनी जे केलं ते जनतेचा अपमान आहे. भाजपा विरोधीपक्षात बसण्यास तयार पण ज्या गोष्टी मान्य केल्या त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणे, ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम न राहणे मग विरोधी पक्षातदेखील बसू हा जनतेचा अपमान आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशाने केंद्रीय मंत्री राजीनामा देत आहे. एका मंत्रिपदासाठी अशा खोट्या वातावरणात का राहावं? महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालं ते दुर्दैवी, यासाठी भाजपाच जबाबदार आहेत. जे ठरलं आहे त्यावरुन बोलण्यास तयार नाही तर कोणतं नातं आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यपालांनी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली तर भाजपाला ७२ तासांची मुदत दिली हे समजून घेतलं पाहिजे. सरकार बनविणं आमचे कर्तव्य, जास्त मुदत मिळणे गरजेचे आहे. मात्र राज्याला राष्ट्रपती राजवटीपर्यंत ढकलायचं हे षडयंत्र रचलं जात आहे. ज्या घटनात्मक तरतूदीनुसार काम करता येईल ते करणार आहोत. आमच्या भूमिका राज्यपालांकडे मांडणार आहोत. शिवसेनेवर राज्यपालांनी सरकार बनविण्याची जबाबदारी निमंत्रण दिलं. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सरकार बसविण्याचा प्रयत्न करणार आहोत असं संजय राऊतांनी सांगितले.