महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडं; संजय राऊत यांची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 11:00 AM2019-11-03T11:00:32+5:302019-11-03T11:01:30+5:30
शिवसेना दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसून येत आहे.
मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. शिवसेनेनं ठरल्याप्रमाणे सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली होती. परंतु शिवसेनेची ही मागणी धुडकावून अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. यानंतर शिवसेना दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसून येत आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप करत भाजपा सारखं घाणेरडं राजकारण गुंडाच्या टोळ्या देखील करणार नसल्याचं सांगत भाजपावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपाकडून गेल्या काही दिवसात सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला असून आमदारांच्या संपर्कासाठी गुंडागर्दी करण्यात येत आहे. माझ्याकडे यासंबंधीत अनेक पुरावे असून योग्यवेळी मी त्याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे इशारा देखील संजय राऊत यांनी भाजपाला दिला. याआधी देखील राज्यात आधी ईडीची धमकी दिली जात होती. आता राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर आले होते. त्यावेळी सत्तापदांच्या समान वाटपांचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्यामुळे शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा चर्चा व्हायला हवी. हरयाणासारख्या लहान राज्यातल्या सत्ता स्थापनेचा प्रश्न शहा दोन दिवसात सोडवतात. मात्र महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा 9 दिवसानंतरही कायम असल्याचं राऊत यांनी म्हटलं. अमित शहांशी आमचे मधुर संबंध असून ते अतिशय रोखठोक स्वभावाचे नेते आहेत. त्यांना परिस्थितीचं उत्तम आकलन असल्याचे कौतुकोद्गारदेखील राऊत यांनी यावेळी काढले.