Join us

Maharashtra Election 2019 : आता उमेदवारांसोबत ‘बॉडीगार्ड’; घाटकोपर प्रकरणामुळे पोलीस उपायुक्तांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 5:52 AM

उमेदवारी अर्ज भरण्याआधी मेहता यांच्या समर्थकांनी शहा यांची कार अडवून तोडफोड केली.

मुंबई : घाटकोपरच्या तोडफोड प्रकरणानंतर आता उमेदवारांना बॉडीगार्ड म्हणून त्यांच्या सोबत एक पोलीस नेमण्यात आला आहे. उमेदवार जिथे जातील तेथे पोलीस त्यांच्यासोबतच राहणार असल्यामुळे त्यांच्या मुक्तवावरण्यावर निर्बंध येत असल्याचे चित्र मुलुंड ते घाटकोपर परिसरात पहावयास मिळते आहे. परिमंडळ सातचे उपायुक्त अखिलेश सिंह यांच्या आदेशाने उमेदवाराच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून पोलीस नेमण्यात आले आहेत.घाटकोपर पूर्व मतदारसंघात माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाने नगरसेवक पराग शहा यांना उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज भरण्याआधी मेहता यांच्या समर्थकांनी शहा यांची कार अडवून तोडफोड केली. तसेच त्यांच्या चालकासह सुरक्षारक्षकालाही मारहाण केली. याप्रकारामुळे घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढे असा प्रकार होवू नये म्हणून प्रत्येक उमेदवारासोबत एक पोलीस नेमून देण्यात आला आहे. यात, पक्ष उमेदवाराबरोबरच अपक्ष उमेदवारालाही खाकीतला हा बॉडीगार्ड देण्यात आला आहे.उमेदवार सकाळी घराबाहेर पडल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत घरी परतेपर्यंत संबंधित पोलीस त्यांच्यासोबत असणार आहे. त्यात, तो प्रचारासाठी जिथे जिथे जाणार तिथे पोलीस त्याच्यासोबतच राहणार आहे. अनेकदा प्रचारादरम्यान दोन प्रचार रॅली, पदयात्रा या समोरासमोर येतात. अशावेळी पक्षाअंतर्गत असलेली स्पर्धा, लढतीमुळे कार्यकर्तेही आक्रमक होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा निर्णय फायदेशीर ठरु शकतो असेही स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे.शिवाय, अर्ज दाखल करण्यापासून विजयी मिरवणुकांपर्यंत प्रत्येकाला प्रचाराची समान संधी मिळावी यासाठी समन्वय आवश्यक असतो. पोलीस सोबत असल्यास प्रत्येक उमेदवाराचा प्रचार कार्यक्रमाबाबत पोलिसांना माहिती मिळू शकते. शिवाय, दोन किंवा जास्त उमेदवार प्रचारादरम्यान एकाच ठिकाणी येणार असतील तर तेथे बंदोबस्त लावून संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही वेळीच ठोस पाऊल उचलले जावू शकतात असेही पोलिसांनी सांगितले.बॉडीगार्डला हाताळायचे कसे ?दसऱ्यानंतर प्रचाराचा जोर वाढेल. यावेळी उमेदवाराच्या प्रचार, पदयात्रा, सभाही खºया अर्थाने सुरु होतील. या काळात अनेक छुप्या बैठकाही जोर धरतील. यात महत्त्वाच्या निर्णयादरम्यान उमेदवारही यात सहभागी होतो. मात्र, अशावेळी पोलीस सतत सोबत असल्यास उमेदवाराच्या अडचणीत मात्र वाढ होणार असल्याचा सूर कार्यकर्त्यांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या बॉडीगार्डला कसे हाताळायचे याबाबत उमेदवार विचार करताना दिसत आहेत.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुंबई