Join us

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; काय घडलं 'मातोश्री'वर? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 11:32 AM

मात्र दिवाळी फराळाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी अनपौचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्रिपदाबाबत युतीच्या बैठकीत काहीही ठरलं नव्हतं असं वक्तव्य केलं होतं

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम राहिल्याने राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबत अद्यापही संभ्रम आहे. भाजपा कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद सोडणार नाही अशी भूमिका भाजपा नेत्यांनी घेतल्याने सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाही. 

गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेला ठरलं आहे तेच करा, मला आणखी काही नको, मी युती स्वत:हून तोडणार नाही. ते पाप मला नको, मुख्यमंत्रिपद मान्य असेल तर भाजपाच्या श्रेष्ठीने फोन करावा असं मत बैठकीत मांडलं. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ३ वेळा फोन केला. मात्र हे फोन उचलले गेले नाहीत असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदावर शिवसेना ठाम आहे. मात्र दिवाळी फराळाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी अनपौचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्रिपदाबाबत युतीच्या बैठकीत काहीही ठरलं नव्हतं असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. 

जे बैठकीत ठरलं होतं तेच मी मागत होतो. मात्र मला खोटं पाडणार असाल तर ते सहन करणार नाही अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. तत्पूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फार काळ राहावं असा डावपेच महाराष्ट्रात सुरु आहे. काळजीवाहू म्हणून सूत्र हलवू नये, बहुमत असेल तर सिद्ध करा, घटनेनुसार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. 

सरकार बनविण्याची संधी सर्वात मोठ्या पक्षाला आधी मिळते. शिवसेनेशिवाय सरकार बनविणार नाही असं भाजपा नेते म्हणतात मग लोकसभापूर्वी काय ठरलं होतं त्यावर बोलावं. कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, तथाकथित मध्यस्थांना उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. शिवसेना-भाजपामधील हे प्रकरण त्यात तिसऱ्याने मध्ये पडण्याची गरज नाही अशा शब्दात मध्यस्थी करणाऱ्यांना शिवसेनेने फटकारलं आहे. 

महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?; सत्तास्थापनेचा पेच वाढला

'काळजीवाहू मुख्यमंत्रिपदावर राहणं हा डावपेच; फडणवीसांना राजीनामा द्यावाच लागेल' 

...म्हणून तेल लावलेल्या पैलवानावर नागपूरला परतण्याची वेळ आली; काँग्रेसचा फडणवीसांना टोला

 'अटल' शब्दात भाजपाला टोला; संजय राऊत पुन्हा बरसले

माणसं अहंकारानं वागतात तेव्हा मला 'ही' कव्वाली आठवते; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपामुख्यमंत्री