महाराष्ट्र निवडणूक 2019: "मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार; ही तर जनतेची इच्छा"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 10:15 AM2019-11-01T10:15:13+5:302019-11-01T10:46:15+5:30
संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, असं म्हणत भाजपाला ठणकावलं आहे.
मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून सुंदोपसुंदी सुरूच आहे. निवडणुका होऊन आठवडा उलटला तरी भाजपा-शिवसेना दोन्ही पक्षांना सत्तेच्या वाटपाचा तिढा सोडवला आलेला नाही. भाजपाने सरकारमध्ये शिवसेनेला झुकते माप देण्यास नकार दिल्याने शिवसेनाही प्रचंड आक्रमक झाली आहे. त्यानंतर आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, असं म्हणत भाजपाला ठणकावलं आहे.
शिवसेनेनं ठरवल्यास स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही आवश्यक बहुमत सिद्ध करू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं की शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा. जो 50-50चा फॉर्म्युला जनतेसमोर ठरला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसारच काम झालं पाहिजे. भाजपा आणि सेनेनं एकत्र येऊन सरकार चालवावं, असा जनतेनं कौल दिला आहे. सामाजिक, राजकीय जीवनात अहंकारानं भरलेला माणूस बुडून जातो हा इतिहास आहे. इतिहासातून सर्वांनीच शिकायला हवं, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.
संजय राऊत- शरद पवार भेट; शिवसेनेचा भाजपावर दबाव, चर्चेला उधाण
काल घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवर संजय राऊत म्हणाले, सन्माननीय पवारसाहेबांना मी अधूनमधून भेटत असतो. त्यात काही नवीन नाही, त्याबाबत माझ्यावर टीकाही होत असते. ते या देशाचे अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. अनेक दिवस मी त्यांना भेटलो नव्हतो. राजकारणाविषयी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. सदिच्छा भेट घेतल्याचं मान्य करायला काहीच अडचण नाही. शरद पवारांच्या भेटीमागे राजकारण नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो; संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणाला?
आम्ही हवेत तीर मारत नाही. आकडे नसताना आमचंच सरकार येणार, असं कधी मानत नाही. प्रत्येक पक्षाची स्वतःची अशी एक विचारधारा असते. एक अजेंडा असतो. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीलाही सत्ता भाजपाच्या हातात जावी, असं वाटत नसेल. आमचा त्यांच्याशी काहीही संपर्क नाही. पण शिवसेनेनं ठरवल्यास बहुमत सिद्ध करू शकेल. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणार अशा अफवा वृत्तपत्रांमधून पसरवल्या जात आहेत. परंतु तसं अद्याप काहीही ठरलेलं नाही. आम्ही ठरवल्यास आमचं सरकार आणि मुख्यमंत्री होऊ शकतो. पण ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी सरकार स्थापन करण्याचं धाडस करू नये, असा इशाराही नाव न घेता संजय राऊतांनी भाजपाला दिला आहे. आमचा नेता व्यापारी नाही. आमचा राजाही व्यापारी नाही आणि आमचे कार्यकर्तेसुद्धा व्यापारी नाहीत. त्यामुळे आमच्याशी व्यापाराचा सौदा होणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.