मुंबई : ‘मी पुन्हा येईन, महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरत्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी व्यक्त केला आणि ते महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जनतेसमोर गेले. त्यांच्याच नेतृत्वात भाजपने मतदारांचा कौल मागितला. सत्तेत परतण्याचा फडणवीस यांचा निर्धार आज मिळालेल्या जनाधाराने सफल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असे प्रचारसभांमधून सांगितले होते. पारदर्शक आणि गतिमान कारभाराची पाच वर्षे राज्याला देत पुन्हा एकदा मतदारांसमोर गेलेल्या फडणवीस यांनी महायुतीची सत्ता पुन्हा एकदा दृष्टीपथात आणली आहे. ग्राम पंचायतींपासून लोकसभेपर्यंत भाजपला सत्तेत आणण्यात मुख्यमंत्र्यांची जनमानसातील आश्वासक प्रतिमा सहाय्यभूत ठरली. मात्र, फडणवीस भाजपला राज्यात पुन्हा सत्ता मिळवून देऊ शकतील का असा सवाल करणाऱ्यांना आजच्या निकालाने योग्य ते उत्तर दिले आहे.
फडणवीस हे वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण २०१४ मध्ये हेरले आणि त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली. यावेळच्या निवडणुकीत भाजप हा एकमेव असा पक्ष होता की ज्याने मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित केला होता. ‘दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ या शब्दात पंतप्रधानांनी याहीवेळी त्यांना आशीर्वाद दिले. भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत देऊन मतदारांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.