मुंबई : निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येत असून शिवसेनेने ‘फिफ्टी-फिफ्टी’चा आपटबार फोडल्याने युतीत अडचणी निर्माण करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास पाठिंब्याचा विचार करू अशी दिवाळी ऑफर काँग्रेसने दिली आहे.
जनतेने भाजपला १२२ वरून १०५, तर शिवसेनेला ६३ वरून ५६ जागांवर रोखले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात पूर्वीपेक्षा अधिक जागांचे माप टाकले. प्रचारात भाजपने 'अब की बार, २२० पार' अशी घोषणा दिली होती. आमच्या समोर कुस्तीसाठी पैलवानचे नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. मात्र, तसे घडले नाही. शरद पवारांच्या झंझावातामुळे महायुतीचा वारू जेमतेम १८० पर्यंतच रोखला गेला.
सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार का? यावर पवार म्हणाले, तशी गरज पडणार नाही. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलेला आहे. त्यानुसार आम्ही सक्षम विरोधकांची भूमिका निभावणार आहोत. मात्र आजवरच्या अनुभवातून त्यांच्या या विधानाचा नेमका उलटा अर्थ काढला जात आहे.
निकालानंतर शिवसेनेचाही सूर बदलला आहे. समान सत्तावाटपाची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवाय, 'महाराष्ट्राच्या जनतेला ‘उतमात’ मान्य नव्हता आणि नाही. त्यामुळे उतू नका, मातू नका नाहीतर माती होईल,' असा इशाराही उद्धव यांनी दिला आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवे आहे. शिवसेनेचे आमदारही त्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच ‘आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री; असे बॅनर मुंबईत झळकले आहेत.
मातोश्रीवर आज बैठकउद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सर्व विजयी आमदारांची बैठक शनिवार बोलावली आहे. या बैठकीत सत्तेतील भागीदारीबाबत खल होण्याची शक्यता आहे. आजवर भाजपच्या सर्व अडचणी समजून घेतल्या. मात्र यापुढे ते शक्य होणार नाही, असा सूचक इशारा उद्धव यांनी दिला होता.
सेनेचा प्रस्ताव आल्यास पाहू : काँग्रेसशिवसेनेकडून पाठिंब्यासाठीचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. तो आला तर दिल्लीला पक्षश्रेष्ठीकडे पाठवू, असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ते म्हणाले की, जनतेने भाजपचा सत्तेचा अहंकार उतरवला आहे. सत्तेच्या मग्रुरीला चाप लावला आहे. दोन्ही काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले आहे. त्या तुलनेत भाजपला मोठा फटका बसला आहे.